अस्सल हापूस देताय, मग 'जीआय' नोंद हवीच !
हापूसच्या नावावर बोगस विक्री रोखण्यासाठी बागायतदारांना आवाहन, जिल्ह्यात ९०० आंबा बागायतदारांची नोंदणी
रत्नागिरी :
कोकण 'हापूस'च्या नावाने अन्य आंब्यांच्या होणाऱ्या विक्रीला बागायतदारांकडून विरोध होत आहे. मात्र ही नोंदणी करण्यासाठी - जीआय देणाऱ्या संस्थांना बागायतदारांचे मेळावे घ्यावे लागत आहेत, आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ९०० बागायतदार, १४० प्रक्रिया व्यावसायिक यांनी 'जीआय'ची नोंदणी केलेली आहे.
हापूसच्या नावाने बोगस विक्री रोखण्यासाठी कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे. रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूसला तीन वर्षांपूर्वी जीआय मानांकन मिळाले आहे. देवगडचा हापूस आंबा 'देवगड हापूस तर रत्नागिरीचा हापूस 'रत्नागिरी हापूस' नावाने ओळखला जात आहे. रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल्याने या आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विकता येणार नाही. मात्र, त्यासाठी बागायतदारांना जीआय मानांकनासाठी अधिकृत नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी केल्यानंतर बागायतदारांना जीआय टॅग लावून आंबा विक्रीसाठी पाठवता येतो. फळासोबत लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर मोबाइलमध्ये फळाचे उत्पादक व
प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळणार आहे.