मुलगी हवी तर डॉक्टरची हत्या कर !
दिल्ली डॉक्टर हत्या प्रकरणात खुलाशाने खळबळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील युनानी डॉक्टर जावेद अख्तर यांच्या हत्या प्रकरणात नवा खुलासा समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या निमा रुग्णालयात ही हत्या गुरुवारी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 16 वर्षांच्या एका कायदेशीरदृष्ट्या अज्ञान आरोपीला अटक केली आहे. मात्र, त्याने दिलेल्या माहितीमुळे पोलीसही चक्रावून गेले असून पुढील तपास वेगाने केला जात आहे.
जावेद अख्तर यांची त्यांच्याच रुग्णालयात हत्या करण्यात आली होती. त्या हत्येची सुपारी एक नर्स आणि तिच्या पतीने दिली होती. अल्पवयीन आरोपी या नर्सच्या मुलीच्या प्रेमात होता. तुला माझ्या मुलीशी लग्न करण्याची अनुमती मी देतो. पण त्यासाठी तुला आधी अख्तर यांची हत्या करावी लागेल, अशी अट या नर्सच्या पतीने घातली होती, असे पकडलेल्या आरोपीचे म्हणणे आहे.
कथित प्रेमप्रकरणातून सुपारी
या प्रकरणातील नर्सचे हत्या झालेल्या डॉक्टरशी प्रेमसंबंध होते, असा संशय या नर्सच्या पतीला होता. त्यामुळे त्याने या डॉक्टरला संपविण्याची योजना आखली होती. आपल्या मुलीवर प्रेम करणाऱ्या अल्पवयीन युवकाची निवड त्याने ही हत्या करण्यासाठी केली. अल्पवयीन युवकांनी कोणताही गुन्हा केला तरी त्यांना अतिशय कमी शिक्षा केली जाते. हत्या किंवा बलात्कारासारख्या गुन्ह्यातही अशा आरोपींना केवळ तीन वर्षांच्या रिमांडची शिक्षा होते. ही बाब सदर नर्सच्या पतीला माहीत असावी आणि त्यामुळे त्याने आपल्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या अल्पवयीन युवकाची निवड हत्या करण्यासाठी केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
हत्या कशी करण्यात आली...
गुरुवारी दोन अल्पवयीन युवक डॉ. जावेद अख्तर यांच्या रुग्णालयात सकाळी सव्वाअकराच्या आसपास आले. त्यांच्यापैकी एकाच्या पायाला जखम झाली होती. त्याने रुग्णालयात ड्रेसिंग करुन घेतले. नंतर दोघांनीही अख्तर यांच्या कक्षात प्रवेश केला. त्यानंतर थोड्याच वेळात कक्षातून गोळीबाराचा आवाज आला. नंतर दोघेही युवक रुग्णालयाबाहेर आले आणि मोटरसायकलवरुन पळून गेले. कर्मचाऱ्यांना अख्तर त्यांच्या खुर्चीवर रक्तबंबाळ स्थितीत आढळले. नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. नंतर रुग्णालयाबाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात आला. गोळीबार करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे.