हिंमत असेल तर प्रकरण सीबीआयकडे सोपवा
बी. वाय. विजयेंद्र यांच्यावरील दीडशे कोटींच्या आरोपावर भाजपचे आव्हान
बेळगाव : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी केलेल्या 150 कोटी रुपयांच्या आरोपामुळे सोमवारी विधानसभेत गदारोळ माजला. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरले. विजयेंद्र यांनी विधानसभेत आपली बाजू मांडत या प्रकरणाबरोबरच मुडामधील भूखंड घोटाळ्याचीही सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली. सोमवारी उत्तरार्धाच्या पहिल्या दिवशी माजी आमदार नरसिंहस्वामी जे. व प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी प्रियांक खर्गे यांनी कोणत्या नियमाखाली विजयेंद्र यांच्यावर आरोप केला, यासंबंधी त्यांनी सभाध्यक्षांना नोटीस पाठवली होती का? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी भाजपच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यामुळे गदारोळ सुरू झाला.
सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी विजयेंद्र यांना त्यांच्यावरील आरोपाला स्पष्टीकरण देण्यासाठी वेळ दिला. त्यामुळे गदारोळ शांत झाला. आपण विधानसभेत नसताना प्रियांक खर्गे यांनी आपल्यावर 150 कोटी रुपयांच्या आमिषाचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. भाजपच्या राजवटीत काँग्रेस नेत्यांकडून झालेल्या वक्फ जमिनीच्या दुरुपयोगाची चौकशी करण्यासाठी जगदीश शेट्टर यांनी हे प्रकरण लोकायुक्तांकडे सोपविले होते.
त्यावेळचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अन्वर मानीप्पाडी यांनीही सरकारकडे चौकशी अहवाल दिला होता. तोपर्यंत सत्तापालट होऊन काँग्रेस सत्तेवर आली. 3 मार्च 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपलोकायुक्तांच्या चौकशीचा अहवाल ठेवण्यात आला. मंत्रिमंडळाने हा अहवाल फेटाळला. तरीही मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर आरोप करीत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना सीबीआयवर विश्वास वाटतोय ही गोष्ट चांगली आहे, असे सांगतानाच आपल्यावरील आरोपांची चौकशी करण्याबरोबरच अन्वर मानीप्पाडी यांनी दिलेल्या अहवालावर चर्चा करण्याची मागणी विजयेंद्र यांनी केली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या अनेक घोटाळ्यात गुंतले आहेत, असा आरोप विजयेंद्र यांनी केला. त्यावेळी कृष्ण भैरेगौडा यांनी त्याला आक्षेप घेतला. तुमच्यावरील आरोपांना स्पष्टीकरण द्या, राजकीय आरोप का करीत आहात? असा सवाल कृष्ण भैरेगौडा यांनी उपस्थित केला. त्यावेळी संतप्त विजयेंद्र यांनी कोरोना काळातील घोटाळा, मुडामधील भूखंड घोटाळ्याची पण चौकशी सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली. प्रियांक खर्गे शुद्ध असल्यासारखे वावरतात. त्यांनी केआयडीबीला जमीन का परत केली? असा प्रश्न विजयेंद्र यांनी उपस्थित केला. या चर्चेत हस्तक्षेप करीत हिंमत असेल तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे आव्हान विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला दिले.
प्रश्न उपस्थित करताच गदारोळ
विरोधी पक्षनेत्यांनी सिद्धरामय्या सरकार बेजबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला प्रियांक खर्गे यांनी आक्षेप घेतला. याआधीचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अन्वर मानीप्पाडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरएसएसचे मुकुंद यांना पत्र लिहिले आहे. तेव्हा हे प्रकरण सीबीआयकडे का दिले नाही? असा प्रश्न उपस्थित करताच पुन्हा गदारोळ वाढला. दरम्यान, ब्रिटिश हायकमिशनर चंद्रू अय्यर, सुप्रिया चावला आदींसह शिष्टमंडळ अधिवेशन पाहण्यासाठी सोमवारी विधानसभेत पोहोचले होते. सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी त्यांचे स्वागत केले.