कसोटी क्रिकेटविषयी गंभीर असाल, तर देशांतर्गत क्रिकेट खेळा
फॉर्मशी झुंजणाऱ्या रोहित, विराटसह सर्व वरिष्ठ खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा सल्ला
वृत्तसंस्था/ सिडनी
सध्या फॉर्मशी झुंजणारे स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना उत्कृष्ट कामगिरी करण्याची भूक अजूनही आहे. परंतु त्यांच्यासह सर्व वरिष्ठ खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे आणि कसोटी क्रिकेटकडील आपली बांधिलकी दाखवावी, असे आवाहन भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रविवारी केले.
स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिलेल्या गंभीरने रोहित किंवा कोहली पुढे कसोटी संघाचा भाग असतील की नाही याबद्दल कोणतेही आश्वासन दिले नाही. ऑस्ट्रेलियाविऊद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेदरम्यान दोन्ही बडे खेळाडू फॉर्मात नसल्यामुळे संघाला मोठा फटका बसून बॉर्डर-गावसकर मालिकेत 1-3 असा पराभव पत्करावा लागला तसेच जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचे स्वप्नही भंगले.
पाच महिन्यांनंतर आपण कोठे असणार आहोत याबद्दल बोलण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी सध्याचा क्षण योग्य नाही. खेळात अनेक गोष्टी बदलतात, फॉर्म बदलतो लोक बदलतात, दृष्टिकोन बदलतात. थोडक्यात खेळात सर्व काही बदलते आणि आम्हा सर्वांना माहीत आहे की, पाच महिने हा खूप मोठा काळ आहे, असे गंभीरने मालिकेनंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. त्यामुळे जुलैमधील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी काय घडते ते पाहूया. पण जे काही घडेल ते भारतीय क्रिकेटच्या हिताचेच होईल, असे हा माजी सलामीवीर ठामपणे म्हणाले.
23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेत वरिष्ठ खेळाडूंनी दोन नसल्या, तरी किमान एक फेरी खेळावी असे वाटते का, असे विचारले असता गंभीरने स्पष्ट संदेश दिला. ‘प्रत्येकाने देशांतर्गत क्रिकेट खेळावे असे मला नेहमीच वाटते. देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देणे आवश्यक आहे. केवळ एकच सामना नव्हे, जर उपलब्ध असतील आणि कसोटी क्रिकेट खेळण्याकडे बांधिलकी असेल, तर प्रत्येकाने देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे, असे मत त्याने व्यक्त केले.
‘हे सरळ-सोपे आहे. तुम्ही देशांतर्गत क्रिकेटला आवश्यक महत्त्व दिले नाही, तर तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये हवे तसे खेळाडू कधीच मिळणार नाहीत, असे गंभीरने स्पष्टपणे सांगितले. कोहलीने शेवटचा रणजी चषक सामना 2012 मध्ये खेळला होत, तर रोहितचा सर्वांत अलीकडील देशांतर्गत रणजी चषक सामना 2015-16 च्या हंगामातील होता.
कठोर बोलण्यासाठी विख्यात असलेल्या गंभीरने कोहली आणि रोहितच्या भविष्याविषयी भाष्य करण्यास नकार दिला आणि भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या भूमिकेचे विश्लेषण करण्याच्या दृष्टीने ते खेळाडू स्वत:च सर्वोत्कृष्ट न्यायाधीश आहेत, असे त्याने सांगितले. ‘मी कोणत्याही खेळाडूच्या भवितव्याबद्दल बोलू शकत नाही, ते त्यांच्यावर अवलंबून आहे. पण मी म्हणू शकतो की, त्यांना अजूनही भूक आहे, त्यांच्यात अजूनही उत्साह आहे’, असे तो पुढे म्हणाला. खराब फॉर्ममुळे पाचव्या कसोटीतून बाहेर पडल्याबद्दल रोहितचे गंभीरने कौतुक केले.