कचरा वर्गीकरण शंभर टक्के झाल्यास दरमहा 15 लाखांची होणार बचत
बेळगाव : महापालिकेकडून नोव्हेंबर महिन्यापासून बेळगावात कचरा वर्गीकरण सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे 80 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होत असल्याने महापालिकेची दरमहा सरासरी 10 लाख रुपयांची बचत होत आहे. कचऱ्याचे वर्गीकरण शंभर टक्के झाल्यास दरमहा 15 लाख रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण शंभर टक्के व्हावे, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शहरातून दररोज 250 टन कचरा प्रक्रियेसाठी तुरमुरी येथील घनकचरा निर्मूलन प्रकल्पात पाठवला जात होता. तो आता 190 ते 200 टनापर्यंत कमी झाला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा खर्च दरमहा 7 ते 10 लाखांनी कमी झाला आहे. तुरमुरी येथील घनकचरा निर्मूलन प्रकल्पाचा ठेका रिसस्टेनेबिलिटी या कंपनीकडे आहे. नुकतेच या कंपनीने सादर केलेल्या बिलावरून प्रक्रिया खर्च कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कायद्यानुसार कचरा देणाऱ्यांनी घरातच कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडून कचऱ्याचे वर्गीकरण करून दिले जाणार नाही, त्यांचा कचरा उचल केला जात नसल्याने नागरिकांकडून आता सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
80 टक्के वर्गीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण
तुरमुरी कचरा डेपोकडे जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी झाले असून सुका कचरा सिमेंट कंपन्यांकडे पाठवला जात आहे. सध्या 190 ते 200 टन कचरा शहरात तयार होत असून 80 टक्के वर्गीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मात्र, शंभर टक्के वर्गीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असून तसे झाल्यास दरमहा 15 लाखांची बचत होणार आहे.