गावांचा विकास झाल्यास भारत आत्मनिर्भर
इस्लामपूर :
ग्रामीण भागात आवश्यक त्या सोयी-सुविधा नसल्याने अनेक तरुण व परिवार मजबुरीने शहराकडे गेले. अॅग्रीकल्चरल, ट्रायबल, आणि जनरल या क्षेत्रामध्ये 65 टक्के लोकसंख्या असून 14 टक्के लोकसंख्या अॅग्रीकल्चरलमध्ये काम करते. भारत देशाला खऱ्या अर्थाने समृध्द व संपन्न बनवायचे असेल, तर शहरांबरोबर गावांचा विकास झाला पाहिजे. शिक्षणापासून आरोग्य सुविधेपर्यंत आणि रोजगारांपासून विकास होत नाही तोवर भारत आत्म]निर्भर बनू शकत नाही, असे मत पेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
राजारामबापू इन्सिस्टयुट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उभारलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह, व अत्याधुनिक जिम्नॅसियमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे होते. यावेळी खा. विशाल पाटील, आ. सुरेश खाडे, आ. अरूण लाड, आ. सुहास बाबर, आ. रोहित पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आ. मानसिंगराव नाईक, दिलीपराव पाटील, आर.आय.टी.चे चेअरमन भगतसिंह पाटील, प्रतिक पाटील, राजवर्धन पाटील, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले, बदलत्या काळामध्ये आपल्याला विकासाबाबत गंभीरपणे विचार करावा लागेल. 90 टक्के लोक हे ग्रामीण भागात राहत. पण हळूहळू 35 टक्के जनतेचे स्थलांतर झाले. मुंबई, पुणे, कोलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, दिल्ली या सगळया शहरात झोपडपट्या तयार झाल्या. त्यातील सगळे ग्रामीण भागातून मजबुरीने गेले. गावात शुध्द पाणी नव्हते, शिक्षण, रस्ते सुविधा नव्हत्या. हे चित्र बदलण्यासाठी गावांचा विकास साधला पाहिजे. त्यासाठी भविष्यात रस्ते विकाससह इतर विकासाकडे लक्ष द्यावे लागेल.
आपण भविष्यात सुखांक (डोमेस्टिक हॅप्पी हयुमन इंडेक्स) वाढवला पाहिजे. त्याचाच अर्थ गावातील जनतेला उत्तम घर, मुलांना उत्तम शिक्षण, त्यांना उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. शेतकरी समृध्द आणि संपन्न झाला पाहिजे. त्याच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजेत. त्यातूनच गावे संपन्न होणार आहेत. यापुढे जल, जमीन, जंगल आणि प्राणी याला प्राधान्य द्यावे, कृषी टेक्नॉलॉजीला महत्व द्यावे. बायोमासपासून डांबर तयार करुन नागपूर-जबलपूर रस्त्यावर एक किलोमिटर रस्ता बांधला. तो रस्ता चाचणीनंतर अनेक पट्टीने चांगला बनला. शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा, इंधन, हवाई इंधनदाता बनला आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर विमाने चालतील. त्यातून किमान 10 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात वळले पाहिजेत.
आरआयटीने शिक्षणात उत्तम काम केले आहे. लोकनेते राजारामबापूंनी शिक्षण संस्था उभारली. जयंत पाटील व भगतसिंह पाटील यांनी संस्था वाढवली. येथील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे. शिक्षणातून कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वाढली तर भविष्यात तरुणांना चांगले शिक्षण मिळेल. आपला देश आत्मनिर्भर व तिसरी अर्थव्यवस्था बनवायचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. जगात सगळयात यंग टॅलेन्टेड पॉवर भारतात आहे. मध्यंतरी आयआयटीमधून जे विद्यार्थी पास झाले. ते युरोपीयन कन्ट्री आणि अमेरिकेत मोठया पदावर व पगारावर आहेत. जगात सर्वच क्षेत्रात भारतीय आहेत. त्यांच्या ज्ञानाच्या भरवशावर जगावर राज्य करु शकतो.
आ. जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र व देशात रस्ते विकासाबाबत गडकरी यांचे नाव घेतले जाते. ते नाविन्याचा पाठपुरावा करतात. ऊसापासून इथेनॉल प्रकल्प उभारणीची कल्पना त्यांचीच आहे. ध्यानीमनी नसणाऱ्या वस्तुमधून ऊर्जा निर्मितीसाठी त्यांचा 24 तास अभ्यास सुरु असतो. देशातील काही नामवंत इन्स्टियुटमध्ये आरआयटी आहे. वेगवेगळया सर्व्हेमध्ये आरआयटीचा नंबर 70 ते 80 कॉलेजमध्ये लागतो. आमचे विद्यार्थी संशोधनात पुढे आहेत. पेठ-सांगली रस्ता ना. गडकरी यांच्यामुळे झाला आणि विषेश म्हणजे 46 टक्के बिलोने काम करुन ही संबंधीत कॉन्ट्राक्टरने उत्कृष्ट काम केले आहे. स्वागत संचालक प्राचार्य पी.व्ही.कडोले यांनी केले. आभार कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सावंत यांनी मानले.
- गडकरी राष्ट्रवादीत, अशी बातमी नको
आ. पाटील भाजपमध्ये जाणार या वृत्तावर ते आपल्या भाषणात पत्रकारांना उद्देशून म्हणाले, गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करु नका, मी तुमच्यावर रागावणार पण पत्रकारांनी केलेल्या एका बातमीवर देशभर मोठमोठे चिंतन करणारे लोक ही बातमी करायला लागतात, याचे शल्य आहेत. दोन पक्षाची माणसं चांगल्या उद्देशाने एकत्र येवू शकतात. आरआयटीला रतन टाटांसह अनेक जण भेट देवून गेलेत, शिक्षण संस्थेत आम्ही राजकारण करीत नाही. त्यावर गडकरी भाषणात म्हणाले, जयंतराव राजकारणाचा जादा विचार करु नका, माझी पार्टी व माझे विचार माझ्या बरोबर, राजकारण हे निवडणुका पुरते राहते.
- पेठ-सांगली रस्ता
गडकरी म्हणाले, पेठ-सांगली रस्त्याच्या शुभारंभावेळी जयंतरावांनी 46 टक्के बिलोने कॉन्ट्रक्टर कसे काम करणार, अशी शंका व्यक्त केली होती. त्याच वेळी मी त्यांना तुम्ही चिंता करु नका. त्याने चांगले काम नाही केले, तर त्याला रगडून काढतो, असे सांगितले होते. या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले असून काही महिन्यातच पूर्ण काम होईल.
- शिवाजीराव नाईक यांचे निवेदन
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह अनेकांनी गडकरी यांना रस्ते कामाबाबत निवेदन दिले. यामध्ये नाईक यांनी पेठ-सांगली राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार, पेठ, शिराळा मलकापूर ते अनुस्करा ते मुंबई-गोवा महामार्गापर्यंत करावा, अशी मागणी केली. यावेळी गडकरी म्हणाले, मी या सर्व निवेदनांचा विचार करुन त्याबाबतचा निर्णय माझ्या वेबसाईटवर प्रसिध्द करेन.