ऊस दरावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू! कारखानदार आणि शेतकरी संघटनेमध्ये शाब्दिक चकमक
कोल्हापूर प्रतिनिधी
ऊस दराचा तिढा मिटवण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह विविध शेतकरी संघटनांमध्ये बैठक सुरू असून सभागृहात वातावरण चांगलेच तापले आहे. शेतकरी संघटना आपल्या मागणीवर ठाम असून मोठा पोलीस फाटा जिल्हाधिकारी कार्यालयात हजर आहे. गत हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता प्रति टन 400 रुपये अधिक यावर्षीच्या हंगामासाठी उसाचा दर 3500 रुपये द्या अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी लावून धरली आहे.
जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते या बैठकीसाठी हजर असून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के पी पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात हजर आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या मागणीवर ठाम असून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये ऊस तोडग्यावर दुसऱ्यांदा बैठक होत आहे. पहिली चर्चा विस्कटल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरावर आक्रमक त्यानंतर राजू शेट्टी यांनी या ऊसदरा संदर्भात जिल्हाभरात आक्रोश पदयात्रा सुरू केली होती. आक्रोश पदयात्रेनंतर साखर कारखानदार गांभीर्याने घेत नसल्याने त्यांनी जयसिंगपूर येथे उपोषणाला सुरुवात केली.
आज ऊस दरासंदर्भात दुसऱ्या टप्प्यात बैठक सुरू झाला असून आजची बैठक विस्कटली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच, कोल्हापूर दौऱ्यावर येणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.