गोंधळ असेल तर हायकमांड तोडगा काढेल!
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे स्पष्टीकरण : प्रदेश काँग्रेसमध्ये कोणताही गोंधळ नाही, मीडियाकडून विनाकारण गोंधळ निर्माण
बेंगळूर : आमच्या मते प्रदेश काँग्रेसमध्ये कोणताही गोंधळ नाही. मीडियाने विनाकारण निर्माण केलेले गोंधळ दूर करणे गरजेचे असल्यास हायकमांड त्यावर तोडगा काढण्यासाठी काम करेल, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले. बेंगळुरात रविवारी पत्रकारांशी ते बोलत होते. गृहमंत्री परमेश्वर पुढे म्हणाले, आमच्या राज्यातील मल्लिकार्जुन खर्गे एआयसीसीचे अध्यक्ष आहेत. राज्याच्या राजकारणाची त्यांना पूर्णपणे माहिती आहे. त्यांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. जर त्यांना वाटत असेल की प्रदेश काँग्रेसमध्ये गोंधळ आहे तर ते परदेशातून राहुल गांधी आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतील आणि तोडगा काढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहात का, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, सध्या अशी कोणतीही संधी नाही.
जेव्हा संधी येईल तेव्हा बोलेन. मुख्यमंत्र्यांनी एआयसीसी अध्यक्षांची भेट घेतल्याबद्दल प्रतिक्रिया देताना, पक्ष आणि सरकारमध्ये कोणतीही समस्या नाही. ते कामानिमित्त त्यांची भेट घेतली असेल. आम्ही पाच मंत्र्यांनी सतीश जारकीहोळी यांच्या घरी जेवण केले होते. ती चूक आहे का?, आम्ही भेट घेऊन चर्चा करू नये का?, असा उलट प्रश्न करत काँग्रेस पक्षात हायकमांडचाच निर्णय अंतिम असतो, असेही परमेश्वर म्हणाले. नेतृत्व बदल होईल, मंत्रिमंडळात फेरबदल होईल, असे हायकमांडने आतापर्यंत कोठेही म्हटलेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवडीदरम्यान एआयसीसी निरीक्षक राज्यात आले होते. सीएलपी बैठकीतच निरीक्षकांसमोर सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. निरीक्षकांनी सिद्धरामय्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहतील, असे म्हटलेले नाही. मुख्यमंत्री बदलतील की नाही हे हायकमांडवर अवलंबून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खर्गे राहुल गांधींशी चर्चा करून घेतील निर्णय
राज्यातील दलित मंत्री डिनर बैठका घेतात. पण दलित मुख्यमंत्र्यांबाबत काय घडत नाही या प्रश्नावर परमेश्वर यांनी, आपण सर्वजण बैठक घेतल्यास ते होईल का, सर्व काही हायकमांडने ठरवले पाहिजे. मल्लिकार्जुन खर्गे राहुल गांधींशी चर्चा करून निर्णय घेतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सर्वांच्या मदतीने निवडणुकीत पक्षाला सत्तेत आणले. मी स्वत: पक्षाला सत्तेत आणले, असे म्हणणे योग्य नाही. यापूर्वी, 2013 मध्ये पक्षाध्यक्ष म्हणून मी सर्वांसह काँग्रेस सरकार सत्तेत येण्याची खात्री केली होती. दुर्दैवाने, निवडणुकीत माझा पराभव झाला. माझ्यामुळे पक्ष सत्तेत आला, असे म्हणणे योग्य नाही. पक्ष सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीने सत्तेत आला, असेही त्यांनी गूढपणे सांगितले.