प्रारुप मतदारयादीमध्ये दोष असल्यास पारदर्शकपणे दूर करा
जिल्हा पालक सचिव शेट्टेण्णावर यांची अधिकाऱ्यांना सूचना
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
मतदारयादी विशेष पुनरावलोकन (एसआयआर) कार्य पूर्ण झाले असून प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारुप मतदारयादी संबंधी तक्रारी, हरकती, त्यातील दोष पारदर्शकपणे दूर करावेत. अशी सूचना जिल्हा पालक सचिव संजय शेट्टेण्णावर यांनी केली.
जिल्हा पंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या विविध खात्याच्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मतदार व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रारुप मतदारयादीची पाहणी करावी. त्यासंबंधी काही तक्रारी असल्यास अधिकाऱ्यांनी 23 सप्टेंबरपर्यंत स्वीकारून त्यावर स्पष्टीकरण द्यावे. जिल्ह्यात मतदारयादी सुधारणा करण्यात आल्यानंतर प्रारुप मतदारयादीनुसार जिल्ह्यात 41,07,000 मतदारांपैकी 35,93,561 मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये 18,05,685 पुरुष व 17,87,715 महिला तसेच 161 इतर मतदार आहेत. 5,13,429 मतदार स्थलांतर, मृत, नाव नोंदणी न केलेले असे आहेत.
पीकहानीची पाहणी करा
यंदा जिल्ह्यात पावसाच्या अभावामुळे पिकांची हानी झाली आहे. पीकहानीची पाहणी त्वरित करून विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना त्याची रक्कम देण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी सूचना त्यांनी केली.
जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात पिकांचे नुकसान झाले असून अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली आहे. 20 ग्रामपंचायतींच्या 18 हजार 430 हेक्टर भागाला विम्याची काही रक्कम देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापालिका आयुक्त कार्तिक एम., अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.