वजनात फसवणूक केल्यास कारखान्यांची परवानगी रद्द
मंत्री शिवानंद पाटील यांचा इशारा
बेंगळूर : ऊस वजनात शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास साखर कारखान्यांची चालू हंगामातील ऊस गाळप परवानगी रद्द करण्यात येईल, असा इशारा वस्त्राsद्योग आणि साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी दिला. ऊस उत्पादकांनी एपीएमसीमध्ये वजन करून पावती घ्यावी. हेच ऊस नंतर साखर कारखान्यात वजन करून घ्यावे. वजनात तफावत आढळून आल्यास लेखी तक्रार करावी. याच्या आधारे संबंधित साखर कारखान्याची ऊस गाळप प्रक्रिया रद्द करण्यात येईल. मात्र, लेखी तक्रार करण्यास शेतकरी पुढे येत नसल्याचे शिवानंद पाटील यांनी सांगितले. एपीएमसीमध्ये प्रत्येक 100 रुपयांच्या व्यवहारामागे 60 पैसे सेसचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. स्थानिक एजंटच यामध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे. निरीक्षण टीम तयार करून सेसच्या दुरुपयोगावर नियंत्रण आणण्यात येईल. नवा कायदा आल्यानंतर एपीएमसीमधील सर्व समस्या दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.