‘दोरी’ बळकट असावी तर अशी...
आपल्या आयुष्याची दोरी किती बळकट आहे, हे कोणालाही ज्ञात नसते, असे म्हणण्याची पद्धत आहे. कित्येकदा माणसे अशा स्थितीतूनही जिवंत राहतात, की आपल्याला आर्श्चय वाटल्यावाचून रहात नाही. ऑस्ट्रेलियाची एक स्कायडायव्हर एम्मा केरी ही याचे जिते जागते उदाहरण आहे. ही महिला 14 हजार फूट उंचीवरुन खाली पडूनही जिवंत राहिली आहे. स्कायडायव्हिंग करत असताना तिचे पॅरेशूट उघडलेच नाही. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या वेगाने ती खाली पडली. इतक्या उंचीवरुन पडल्यास कोणीही जिवंत राहणे अशक्यच असते. मात्र, एम्मा केरी ही अशा भाग्यवानांपैकी एक आहे, की जिने जणू साक्षात मृत्यूलाच हरविले आहे.
ही महिला तशी व्यावसायिक स्कायडायव्हर नाही. पण एकदा आपल्या मैत्रिणीसमवेत ती सहलीला गेली असताना तिने स्कायडायव्हिंगचा खेळ पाहिला. आकाशात उंच भरारी घेऊन नंतर पॅरेशूटच्या साहाय्याने तरंगत खाली येण्याच्या या प्रकारने तिला भुरळ घातली. तिनेही हा अनुभव घेण्याचा निर्णय घेतला. ते एका हेलिकॉप्टरमधून आकाशात उडाली आणि तिने तेथून पॅरेशूटच्या साहाय्याने खाली उडी घेतली. काही क्षण सारेकाही योग्य प्रकारे घडले होते. तथापी, उडी घेतल्यानंतर तिला बांधलेले पॅरेशूट उघडावयास हवे होते. तथापि, ते उघडलेच नाही. ते तिच्या पायात अडकले होते. त्यामुळे ती अत्यंत वेगाने सरळ खाली येऊन भूमीवर आदळली. तिला प्रचंड मार लागला. आपण मेलो आहोत, असे क्षणभर तिला वाटले. पण काही वेळातच आपण जिवंत असून निपचित पडलो आहोत, याची तिला जाणीव झाली. पडल्यामुळे तिची हाडे मोडली होती. तिचा पाठीचा कणा तर दोन स्थानी मोडला होता. तिला त्वरित रुग्णालयात देण्यात आले. तिच्यावर अनेक अवघड शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. ती पुन्हा चालू शकेल यावर तिच्या डॉक्टरांचाही विश्वास नव्हता. पण तिचे भाग्य बलवत्तर होते.
या घटनेनंतर अनेक महिन्यांनी तिने चालावयासही प्रारंभ केला आहे. तिच्या कुटुंबाने या काळात तिची चांगली शुश्रूषा केली. तसेच तिला धीर दिला. ती पूर्वीप्रमाणे चालू शकत नसली, किंवा हालचाली करु शकत नसली, तरी ती आज स्वत:च्या पायावर उभी असून तिचे परावलंबित्व संपले आहे. आता ती जवळपास सर्वसामान्य आयुष्य जगण्यास सक्षम झाली असल्याचे दिसून येत आहे.