एकनिष्ठ श्रोता मिळाला तर भगवंत त्यांच्या मनातली गुप्त गोष्ट त्याला सांगतात
अध्याय आठवा
माउली ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्या श्रोत्यांना उद्देशून म्हणतात, वक्त्याचे वत्तृत्व पूर्णपणे श्रोत्यांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असते. जर श्रोते लक्ष देऊन ऐकत असतील, तर बोलणाऱ्याच्या वत्तृत्वाला धुमारे फुटतात. त्याचे बोलणे ओघवते होऊ लागते. श्रोत्यांनी एखादा प्रश्न विचारला की, त्याचा उत्साह आणखीन वाढतो आणि मग त्याच्या वत्तृत्वाला अधिकच बहर येतो. अहो चिंतामणीला पाझरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच असते त्याप्रमाणे वक्त्याला बोलता करण्याची हातोटी श्रोत्यांमध्ये असते. तुम्हाला माझे इतके कौतुक आहे की, माझे सांगणे गोड मानून घ्या असे मी सांगण्याची गरजच नाही. आम्हाला गोड करून घ्या अशी तांदुळाने खाणाऱ्याची प्रार्थना करण्याची गरज नसते कारण खाणाऱ्याला त्यात गोडी कशी आणायची ह्याचे ज्ञान असते. तसेच लाकडाच्या बाहुल्यांनी आमचे नाचणे गोड मानून घ्या असे सूत्रधाराला विनवण्याची गरज नसते कारण त्यांच्याकडून चांगला नाच कसा करून घ्यायचा हे तो पुरेपूर जाणून असतो, त्याप्रमाणे माझे म्हणणे ऐका अशी मी तुमची प्रार्थना करण्याची गरज नाही कारण त्या बाहुल्यांच्या सूत्रधाराप्रमाणे तुम्हीच माझ्याकडून हे व्याख्यान करून घेत आहात. त्यावर श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे, तुझी विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले, ते सांग.
त्यावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज संतोषून उल्हासाने म्हणाले, जी महाराज, ऐका. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, असूयारहित असलेल्या अर्जुना अत्यंत गुह्य असे हे ब्रह्मज्ञान, प्रपंचज्ञानासह, तुला पुन्हा सांगतो. हे जाणल्याने तू अशुभातून मुक्त होशील.
आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज। विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी।।1।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला म्हणाले, तुला असे वाटले असेल की, मला इतका मान देऊन गुह्य असे हे ब्रह्मज्ञान भगवंत का सांगत आहेत. तर ऐक. तुला ज्ञानप्राप्तीची एव्हढी ओढ लागली आहे की, ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच तू मूर्ती झाला आहेस. दुसरं कारण म्हणजे मी सांगितलेल्या गोष्टीचा तू अत्यंत आदर करतोस. म्हणून मी असा विचार केला की, माझ्या हृदयातील गुप्त गोष्ट उघड होत असेल तर होऊदेत. जरी ही गुप्त गोष्ट फक्त तुला सांगणार असलो तरी त्यानिमित्ताने ती इतरांना समजली तरी चालेल. ह्यावरून हे लक्षात येते की, ज्याला ज्ञानप्राप्तीची तीव्र इच्छा असते आणि जो भगवंतांनी किंवा सद्गुरुंनी सांगितलेले पूर्णतया ऐकतो त्याला भगवंत त्यांच्या हृदयातली गोष्ट कोणतीही हयगय न करता सांगायला ते तयार असतात. पुढे भगवंत म्हणाले, अर्जुना, स्तनात दूध असते आणि त्याची गोडी लेकराला असते. याकरता लेकराची स्तनपानाची इच्छा तृप्त झाली की मातेला आनंद होतो त्याप्रमाणे चांगल्या मनाचा, शुद्ध बुद्धीचा, कुणाची निंदा न करणारा, एकनिष्ठ श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गुह्य गोष्ट वक्त्याने खुशाल सांगायला हरकत नाही.
क्रमश:
