इस्रायली सैन्याने कारवाई केल्यास ओलिसांना ठार करा
हमासचा स्वत:च्या दहशतवाद्यांना आदेश : अमेरिकेचा शस्त्रसंधी प्रस्ताव संमत
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
हमासने युद्धाच्या 8 महिन्यांनी स्वत:च्या दहशतवाद्यांना इस्रायली डिफेन्स फोर्सने कारवाई केल्यास कैदेतील इस्रायली ओलिसांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला आहे. नुसीरत कॅम्पमध्ये इस्रायली ओलिसांच्या मुक्ततेसाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेनंतर हमासने हे पाऊल उचलले आहे.
इस्रायलने 8 जून रोजी हमासच्या कैदेतून स्वत:च्या 4 नागरिकांची मुक्तता केली होती. यादरम्यान 270 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले होते. कारवाईदरम्यान 3 ओलिसांचाही मृत्यू झाल्याचा दावा हमासकडून करण्यात आला होता. अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर तसेच सैन्यपथकाने सातत्याने ड्रोन्स, उपग्रह आणि अन्य मार्गांद्वारे गाझामधील ओलिसांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.
इस्रायल आतापर्यंत स्वत:च्या 7 नागरिकांना हमासच्या तावडीतून सोडविण्यास यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे हमासने आता ओलिसांना अत्यंत गोपनीय ठिकाणी हलविले आहे. ओलिसांचा ठावठिकाणा सातत्याने बदलण्याचे पाऊल हमास उचलत आहे.
3 टप्प्यांमध्ये युद्ध रोखणार
युद्धाच्या सुमारे 240 दिवस आणि 37 हजार लोकांच्या मृत्यूनंतर सोमवारी रात्री उशिरा इस्रायल-हमास युद्ध रोखण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत संमत झाला आहे. हा प्रस्ताव अमेरिकेने मांडला होता. सोमवारी या प्रस्तावाच्या बाजूने 15 पैकी 14 सदस्य देशांनी मतदान केले. तर रशियाने मतदानात भाग घेणे टाळले आहे. अमेरिकेकडून मांडण्यात आलेल्या शस्त्रसंधी प्रस्तावात 3 टप्प्यांमध्ये युद्ध संपुष्टात आणण्याचा मुद्दा आहे. पहिल्या टप्प्यात 6 आठवड्यांची शस्त्रसंधी होईल. यादरम्यान हमासच्या कैदेतील काही इस्रायली ओलीस आणि इस्रायलच्या कैदेतील पॅलेस्टिनींची मुक्तता करण्याची तरतूद आहे. दुसऱ्या टप्प्यात युद्ध पूर्णपणे रोखून उर्वरित ओलिसांची मुक्तता करण्यात येईल. अखेरच्या टप्प्यात गाझापट्टीला पुन्हा वसविण्याचा उल्लेख आहे.
हमासच्या खात्म्यानंतरच युद्ध संपणार
अमेरिकेकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव मांडला जात असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी युद्ध रोखण्यास नकार दिला आहे. बिडेन यांनी शस्त्रसंधी प्रस्तावाचा केवळ काही हिस्साच उघड केला आहे. हमास पूर्णपणे संपल्यावरच इस्रायल कायमस्वरुपी शस्त्रसंधीबद्दल चर्चा करणार असल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे हमासने सुरक्षा परिषदेत संमत प्रस्तावाचे स्वागत केले आहे.