एसटी तिकीट दरवाढ झाल्यास लाडक्या बहिणींना बसणार फटका
कोल्हापूर :
एसटी महामंडळाने तिकीट वाढीचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविला आहे. नव्याने स्थापन झालेले फडणवीस सरकार तिकीट वाढीच्या प्रस्तावास ग्रीन सिंग्नल देणार की विधानसभेच्या निवडणूकीत राज्यातील नागरिकांनी भरभरून मते देऊन पुन्हा सत्ता दिल्याबद्दल प्रस्ताव फेटाळून प्रवाशांना गिप्ट देणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. जर तिकीट वाढ झालीच तर निम्म्या तिकीटात प्रवास करणाऱ्या लाडक्या बाहीणांनाही फटका बसणार आहे.
एसटी महामंडळाने नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे सांगत तब्बल 14.13 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नव्याने स्थापन झालेले फडणवीस सरकार यावर निर्णय घेणार आहे. जर त्यांनी एसटी महामंडळाने पाठविलेल्या दरवाढीच्या प्रस्तावास मंजूली दिली. तसेच महामंडळाने प्रस्तावित केलेली दरवाढ कायम ठेवली तर 100 रुपयांच्या तिकिटामागे 14 रुपये जादा मोजावे लागणार आहे. कोल्हापूर-सांगलीचे तिकीट 80 रूपये होण्याची शक्यता आहे.
तर तीन वर्षाने तिकीट वाढ
एसटी महामंडळाने यापूर्वी 27 नोव्हेंबर 2021 रोजी तिकीट दरवाढ केली होती. यानंतर तीन वर्ष दरवाढ झालेली नाही. आता पुन्हा तिकीट दरवाढीचा प्रस्ताव आहे. यास मंजूरी मिळाल्यास तीन वर्षाने तिकीट दरवाढ होणार आहे.
तर महिलांच्या तिकिटामध्येही वाढ
राज्यशासनाने महिला सन्मान योजना सुरू केल्यामुळे महिलांना एसटी बसच्या तिकीटात 50 टक्के सवलत आहे. जर तिकीट दरवाढ झाली तर महिलांच्या तिकीट दरातही वाढ होणार आहे. सध्या कोल्हापुरातून सांगलीला जाण्यासाठी महिलांना एसटीचे 35 रूपये तिकीट आहे. प्रस्तावित तिकीट वाढ मंजूर झाली तर 40 रूपये तिकीट होणार आहे. यातुलनेत रेल्वेमधून 35 रूपयात सांगलीला जाता येणार आहे.
प्रवाशी संख्येवर परिणामाचा धोका
एसटीने 15 टक्के वाढ केल्यास सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसणार आहे. एसटीचे तिकीट वाढल्याने हा प्रवाशी रेल्वे अथवा खासगी वाहतुकीकडे वळण्याचा धोका आहे. योजनांमुळे फायदात आलेली एसटीही तोट्यात जाण्ण्याचा धोका आहे. यामुळे शासन नेमके काय निर्णय घेते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.