‘हातकातरो खांब’चे पुरावे हवे असल्यास सरकारने ताबडतोब उत्खनन करावे
प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांची मागणी
पणजी : हळदोण्याचे काँग्रेस आमदार अॅड. कार्लोस फेरेरा यांनी ओल्ड गोवा येथील ‘हातकातरो खांब’चे नाव बदलण्याची मागणी केली आहे. हा खांब ‘इंक्विजिशन’च्या छळात हात तोडण्यासाठी वापरला जात होता, याचे जर पुरावे पाहिजे असेल तर सरकारने चर्च परिसरात ताबडतोब उत्खनन सुरु करावे म्हणजे योग्य तो पर्दाफाश होईल, असे प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी म्हटले आहे. हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य सहसमन्वयक नितीन फळदेसाई यांनीही अशीच मागणी केली आहे. गोवा सरकारच्या पुरातत्व व पुराभिलेख खात्यातर्फे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या ‘पुराभिलेख’ या नियत-पत्रिकेत या हातकातरो खांबाची फोटोसहित माहिती छापून आलेली आहे.
नामवंत इतिहास संशोधक डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर हे त्यावेळी पुरातत्व व पुराभिलेख खात्याचे संचालक होते. मुळात हा खांब पोर्तुगीज मिशनऱ्यांनी उद्ध्वस्त केलेल्या नार्वे दिवाडी येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिराचा एक खांब! परंतु हिंदूंच्या भावना व श्रद्धांचा अपमान व तेजोभंग करण्यासाठी पोर्तुगीज मिशनऱ्यांनी इंक्विजिशनच्या कैद्यांचे हात या खांबाला बांधून, दोरखंडाला पिळ देऊन, एकेक अवयव सांध्यांतून निखळून काढून कैद्यांचा छळ करण्यासाठी वापरण्यास सुऊवात केली. त्याचे आणखी पुरावे हवे असतील तर इंक्विजिशनचा धर्मच्छल चाललेल्या चर्चच्या परिसरात वेगवेगळ्या स्थानी शास्त्रशुद्ध उत्खनन केले पाहिजे, असे प्रा. वेलिंगकर यांनी म्हटले आहे.
आणखी एक गोष्ट न विसरता लक्षात ठेवली पाहिजे ती ही, की ‘पेलौरिन्यु नोव्हु’ असे सिमेंटवर कोरलेला स्वतंत्र दगड अलिकडे त्या ठिकाणी हेतुपूर्वक हातकातरो खांबाच्या पुढच्या जागेत बसविण्यात आला. हा दगड पूर्णत: नवीन, सिमेंटचे आवरण असलेला आहे, तो ऐतिहासिक नाही, असेही वेलिंगकर यांनी म्हटले आहे. मूळ गांधी पुतळ्यापासून गवंडाळी रस्त्यालगतच्या कोपऱ्यातील जागेत वर्षांनुवर्षे हा हातकातरो खांब विराजमान होता. काँग्रेस सरकारच्या काळात हा खांब तेथून स्थलांतरित करण्यात आला. पेलौरिनु नोव्हु हा दगड याच वेळी खांबाच्या खाली कुणीतरी बसवला.
या दगड बसविण्याला त्याचवेळी आक्षेपही घेण्यात आला होता. कारण या पुरातन खांबाला पेलौरिन्यु नोव्हु (नवा खांब) असे नाव देऊन इतिहास बदलण्याचा हा प्रयत्न होता, असे वेलिंगकर यांनी नमूद केले आहे. आमदार फेरेरांसाठी पुरावे पुरवण्यासाठी आता एकूणच इंक्विजिशन परिसरांत सरकारने ताबडतोब उत्खनन सुरू करावे, म्हणजे आमदार फेरेरांनी काढलेल्या शंकांचे कायमस्वऊपी निरसन करता येईल. सरकारने उत्खनन लवकरात लवकर सुरू करावे, असेही प्रा. वेलिंगकर यांनी म्हटले आहे.