कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू
महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कन्नडसक्ती मागे घेण्याची मागणी
बेळगाव : सीमाप्रश्नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. असे असताना राज्य सरकारकडून या भागात कन्नडसक्ती लागू करण्यात येत आहे. कन्नड संघटनांकडून मराठी फलकांना काळे फासून फलक काढण्यास व्यापाऱ्यांना, नागरिकांना धमकाविले जात आहे. हे प्रकार त्वरित थांबविण्यात यावेत, संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत, 15 दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सीमाप्रश्नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याची माहिती कर्नाटक सरकारलाही आहे. असे असताना बहुभाषिक मराठी भागावर अशा कोणत्याच प्रकारचा कायदा लागू करणे चुकीचे आहे. व्यापाऱ्यांच्या आस्थापनांवर लावण्यात आलेल्या फलकांवर 60 टक्के कन्नडची सक्ती करणे चुकीचे आहे. वाद न्यायालयात असताना या भागातील जनतेवर लादण्यात येणारी कन्नडची सक्ती खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी सरकारने याची जाणीव ठेऊन हा कायदा मागे घ्यावा, सीमाप्रश्नाचा निकाल लागल्यानंतरच याचा निर्णय घेण्यात यावा.
सीमाभागामध्ये बहुभाषिक मराठी नागरिक असताना सरकारने असा कायदा लावणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. कन्नड संघटनांकडून व्यापाऱ्यांना धमकावून कन्नड फलक लावण्यास सक्ती करण्यात येत आहे. धमकावणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा. मनपा आयुक्तांनी व्यापाऱ्यांना नोटीस जारी केली आहे. असे प्रकार थांबविण्यात यावेत, यावर येत्या 15 दिवसांत कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा प्रशासनाने कोणतीच ठोस भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे देण्यात आला. मराठी भाषिकांवर कन्नडची सक्ती लादल्यास रस्त्यावरची लढाई तीव्र करण्यात येईल. मनपा आयुक्तांना सक्ती करण्यात येवू नये, याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. कन्नडची सक्ती अशीच चालू ठेवल्यास मराठी भाषिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनाद्वारे म्हटले आहे. यावेळी नही चलेगी नही चलेगी, कन्नड सक्ती नही चलेगी, बेळगाव आमच्या हक्काचे, अशा घोषणा देऊन जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुस्कर, मदन बामणे, नेताजी जाधव, रणजीत चव्हाण-पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, मनोज पावशे, बी. डी. मोहनगेकर, आर. आय. पाटील, शिवाजी सुंठकर, अॅड. राजाभाऊ पाटील, अॅड. एम. जी. पाटील यांच्यासह खानापूर येथील समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.