बुमराह नसता, तर मालिका एकतर्फीच ठरली असती : मॅकग्रा
वृत्त्तसंस्था/ सिडनी
जसप्रीत बुमराहच्या अतुलनीय कामगिरीमुळे बॉर्डर-गावस्कर मालिका एकतर्फी झाली नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूने पूर्णपणे झुकली नाही, असे महान वेगवान ग्लेन मॅकग्राने म्हटले असून बुमराहचे चेंडूवरील नियंत्रण आणि परिस्थितीशी त्वरित जुळवून घेण्याच्या क्षमतेचे कौतुक केले आहे.
शुक्रवारपासून येथे शेवटचा कसोटी सामना सुरू होणार असून पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. बुमराह हा भारतीय संघाच्या कामगिरीत उठून दिसला असून त्याने 20 पेक्षा कमी सरासरीने 30 बळी मिळविलेले आहेत. तथापि, भारतीय फलंदाजी खराब राहिलेली असून नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला आहे.
बुमराह हा भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो नसता, तर मालिका जास्त एकतर्फी झाली असती. तो जे करतो ते खास असते, असे मॅकग्राने त्याच्या फाउंडेशनच्या कर्करोग जागृती कार्यक्रमाच्या प्रसंगी पत्रकारांना सांगितले. 54 वर्षीय मॅकग्रा हा त्याच्या काळातील सर्वांत सातत्यपूर्ण आणि भेदक वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. 2008 मध्ये त्याची पत्नी जेन हिला कर्करोगामुळे गमावल्यानंतर कर्करोग जनजागृती कार्यक्रमांत तो सक्रियपणे सहभागी होत आला आहे.
बुमराहच्या अप्रतिम कौशल्याने मॅकग्रालाही प्रभावित करून टाकले आहे. बुमराहच्या कमी रनअपबद्दल बोलताना मॅकग्रा म्हणाला की, त्याने परिस्थितीशी जुळवून घेण्याचा मार्ग शोधला आहे. ज्या प्रकारे तो धावून येताना शेवटच्या टप्प्यात गोलंदाजीला वेग मिळवून देतो ते अगदी अविश्वसनीय आहे. 563 कसोटी बळी मिळविलेल्या मॅकग्राला गोलंदाजी टाकताना हात खूपच पुढे जाण्याच्या बाबतीत त्याच्यात आणि बुमराहमध्ये समानता आढळते. यामुळे चेंडूचा टप्पा काही इंच पुढे पडतो, याकडे त्याने लक्ष वेधले. त्याच्याकडे दोन्ही बाजूंनी चेंडू ‘मूव्dह’ करण्याच्या बाबतीत अविश्वसनीय नियंत्रण आहे, मी जसप्रीतचा खूप मोठा चाहता आहे, असेही मॅकग्राने सांगितले.