एमआयडीसीत खंडणी मागत असल्यास तक्रार करा
सातारा :
सातारा जिल्हातील औद्योगिक क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे आणि शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे पार पडली. याप्रसंगी औद्योगिक क्षेत्रात कोणी उद्योजकांना खंडणी मागत असल्यास पोलिसांकडे तत्काळ तक्रार करा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले. त्याचबरोबर कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचनाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, साताराचे उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, फलटणचे उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, पाटणचे सोपान टोम्पे, उपविभागीय अधिकारी, माणचे उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, कोरेगांवचे उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक, तसेच जिल्हास्तरीय समिती सदस्य उमेशचंद्र दंडगव्हाळ महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा व नितीन कवले, जिल्हा कामगार अधिकारी सातारा, डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रादेशिक अधिकारी म.औ.वि.म. सातारा हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील येणाऱ्या अडीअडचणीवर संयुक्तरित्या चर्चा करण्यात आली व त्यामध्ये उपस्थित झालेले मुद्दे खालील प्रमाणे आहेत. बैठकीत एम.आय.डी.सी. क्षेत्रातील महिला कर्मचारी यांच्या सुरक्षेला प्राध्यान्य देवून प्रत्येक औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्भया पथकाव्दारे निगराणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
एम.आय.डी.सी परिसरामध्ये खंडणी मागणे, दहशत पसरविणे, जबरदस्तीने माथाडीचे काम मागणे असे गैरकृत करणाऱ्या इसमाविरुध्द अर्ज करणाऱ्याकरीता एम.आय.डी. सीतील प्रादेशिक कार्यालयामध्ये गोपनीय तक्रार बॉक्स ठेवण्यात यावे व अर्जदारांचे नाव गोपनीय ठेवणे याबाबत सुचित करण्यात आले. तसेच ई-मेल आयडीव्दारे, अथवा पत्राव्दारे निनावी येणारे अर्जाचे नवीन आवक जावक रजिस्टर तयार करण्यात यावे. आणि तात्काळ प्रतिसादाकरीता डायल 112 नंबरचा उपयोग करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. हया उपक्रमामुळे ग्रस्त व्यक्तींना सुरक्षीततेची आणि साहाय्याची भावना मिळेल.
सर्व एम.आय.डी.सी. मधील व खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कंपन्यामध्ये जर कोणी खंडणी मागत असेल याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक शेख यांच्याकडे करावी. खंडणी विरोधी गोपनीय तक्रारीसाठी नविन यंत्रणा स्थापन केली जाईल व खंडणी विरोधी कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.
औद्योगिक क्षेत्रातील आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीत सखोल चर्चा करण्यात आली उपस्थित सदस्य व सचिव आणि कामगार आयुक्त यांनी आपआपले विचार व्यक्त करुन आर्थिक गुन्हेगारीवर कसा निबंध आणता येईल व काय कठोर उपायोजना करणे आवश्यक आहे याबाबींवर चर्चा करण्यात आली. आणि प्राप्त काही गोपनीय अर्जावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शेख यांनी जिल्हयातील संबंधीत पोलीस ठाण्यास दिले आहेत. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेसाठी एक सकारात्मक परिवर्तन साचले जाईल.
बैठकीमध्ये शिरवळ व खंडाळा येथील दोन कंपन्यांच्या तक्रारीची तात्काळ तपासणी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शेख यांनी दिले. एम.आय.डी.सी. बाबतच्या असणाऱ्या तक्रारी अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन नियमीतपणे केले जाईल व गोपनीय तक्रारीकडे प्राध्यान्याने लक्ष दिले जाईल.
या प्रकारच्या नैतिक व धोरणात्मक उपाययोजनांमुळे सातारा जिल्हयामध्ये खंडणी विरोधी लढा अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठक ही औद्योगिक विकासाच्या या युगात एक महत्वाची पायरी ठरली असून भविष्यातील सुरक्षेसाठी सकारात्मक बदलांची आशा निर्माण झाली आहे.