For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेळीच निदान झाल्यास कर्करोगावर मात शक्य

12:02 PM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेळीच निदान झाल्यास कर्करोगावर मात शक्य
Advertisement
प्रा. डॉ. राजेंद्र बी. मेटगुडमठ,डोके आणि मानेच्या कर्करोगाचे वरिष्ठ सर्जन, केएलई डॉ. संपतकुमार एस. शिवणगी, कॅन्सर हॉस्पिटल

बेळगाव : कॅन्सर किंवा कर्करोग म्हटले की, व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबीयांना हादरा बसत असे. ज्याला कर्करोग झाला आहे, त्याच्यापासून हे सत्य लपवून ठेवण्याकडेच कल असायचा. मात्र, हळुहळु परिस्थिती बदलत आहे. वेळीच निदान झाल्यास कर्करोगावर उपचार करून मात करता येते. अशी अनेक उदाहरणे समोर आल्याने आता कर्करोगाची भीती कमी झाली आहे. कर्करोगाविषयीची भीती कमी करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे, आणि त्याबाबत जागृती करणे, या हेतूने पॅरिस येथे 2000 मध्ये जागतिक परिषदेमध्ये कर्करोगविषयी मसुदा मांडण्यात आला. त्या अनुषंगाने 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग प्रतिबंध दिन म्हणून जाहीर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना, जागतिक आरोग्य संघटना व इतर आरोग्य संघटना यांच्या आवाहनानुसार जागतिक कर्करोग प्रतिबंध दिन आचरणात आणला जातो.

Advertisement

कर्करोग हा जागतिक स्तरावरील सर्वात गंभीर अशा सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांपैकी एक आहे. बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांवर त्याचा दुष्परिणाम होतो. देशाची विविध सामाजिक, आर्थिक स्थिती आणि विविध भौगोलिक परिस्थितीसह शरीराच्या कोणत्याही भागामध्ये कर्करोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने आणि ग्लोबोकन-2022 ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कर्करोगाचे अंदाजे 20 दशलक्ष नवीन रुग्ण आहेत.  9.7 दशलक्ष लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कर्करोगाचे अंदाजे 1.4 दशलक्ष नूतन रुग्ण आहेत व 0.9 दशलक्ष मृत्यू झाले आहेत. भारतात अंदाजे 9 पैकी एका व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता असते. जागतिक स्तरावर असा अंदाज आहे की, 2045 पर्यंत कर्करोगाच्या नवीन रुग्णांची संख्या सुमारे 32.6 दशलक्ष असेल व भारतात ती सुमारे 2.46 दशलक्ष असेल. ग्लोबोकॅन-2022 नुसार भारतामध्ये स्तनाचा, तोंडाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा असे तीन कर्करोग प्रामुख्याने होण्याचे प्रमाण अधिक आहे.

कर्करोग इतक्या भयावह दराने वाढत असताना आपण सर्वांनी त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. आपण कोठे चुकत आहोत? कर्करोग रोखण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न करत आहोत का? कर्करोग वाढण्याची मुख्य कारणे कोणती? याचा विचार करायला हवा. मुख्यत्वे आपली सध्याची बदललेली जीवनशैली हे याचे कारण आहे. वेगवान आणि बैठ्या जीवनशैलीमध्ये आपण चुकीच्या आहाराच्या सवयी लावून घेत आहोत. रासायनिक, भेसळयुक्त, दूषित अन्न सेवन करणे, शरीराची अपुरी हालचाल होणे यामुळे आपण आजारांना बळी पडत आहोत. प्रामुख्याने तंबाखू आणि अल्कोहोल म्हणजेच मद्यपानाचे सेवन हे कर्करोगाचे मुख्य कारण आहे. भारतात तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाचे पुरुषांमधील प्रमाण हे 35-50 टक्के आणि महिलांमध्ये 17 टक्के आहे. तंबाखूत असणाऱ्या गुटख्याच्या प्रत्येक लहान पाकिटाची किंमत सुमारे 5 रुपये आहे आणि बहुतेक तंबाखू खाणाऱ्या व्यक्ती दररोज 3 ते 4 पाकिटे सहज खातात.

Advertisement

कच्चा किंवा प्रक्रिया केलेला तंबाखूदेखील वापरला जात आहे. प्रत्येक सिगारेटची सरासरी किंमत 10 ते 20 रुपये आहे. विडीची किंमत तुलनेने कमी आहे. हे भयावह आजार ज्यामुळे उद्भवतात, त्याचे कारण असणाऱ्या उत्पादनांवर आपण दररोज मोठ्या प्रमाणात खर्च करत आहोत. एकदा कर्करोगाचे निदान झाले तर पुढील उपचार आणि व्यवस्थापन यासाठी आर्थिक भार वाढतो. बहुतेक लोक नोकरदार असतात आणि अर्थार्जन करणारे त्यांच्या कुटुंबातील ते एकटेच असतात. कर्करोगाबाबत जागृती होण्यासाठी सरकारी पातळीवर आणि खासगी संस्थांतर्फे मोहिमा राबवूनही भारतात आजही 75 टक्के लोकांना कर्करोग होण्याची शक्यता दिसत आहे. लक्षणे जाणवूनही उशिरा येणे, रोगाबाबत काहीही माहिती न होणे, अप्रशिक्षित डॉक्टरांकडून अचूक निदान न होणे, याची जाहीर वाच्यता टाळणे, ही यामागची कारणे आहेत. प्रारंभीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच नियमितपणे स्वत:ची तपासणी करणे, डॉक्टरांचा सल्ला मानणे व त्यानुसार त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे.

डॉक्टरांकडून योग्य स्क्रीनिंग करून घेणे व ज्या हॉस्पिटलमध्ये अधिक वेळ न दवडता योग्य उपचार केले जाऊ शकतात अशा हॉस्पिटल्समध्ये जाणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशात कर्करोगासंदर्भात दर्जेदार काळजी व उपचारांची उपलब्धता योग्य तऱ्हेने होत नाही. कर्करोगावरील उपचार हा गुंतागुंतीचा व दीर्घकालीन आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. यावर्षाच्या प्रारंभीच ओरिसा राज्यातील तंबाखू आणि निकोटीनच्या सर्व उत्पादनांवर, विडी, सिगारेट, गुटखा आणि पानमसाला यावर पूर्णपणे बंदी घालणारे पहिले राज्य बनले. इतर अनेक राज्यांनी गुटखा व तत्सम उत्पादनांवर बंदी घातली आहे. आपल्याला कर्करोग रुग्णांचे प्रमाण खाली आणायचे असेल तर संपूर्ण भारतामध्ये अमलीपदार्थांवर बंदी घालणे आवश्यक आहे. सेलिब्रेटीजना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. त्याची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होत आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

यासंदर्भात केएलई सोसायटीचे माजी अध्यक्ष व काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी बेळगावमध्ये अत्याधुनिक असे डॉ. संपतकुमार एस. शिवणगी कर्करोग रुग्णालय उभारले आहे. येथे कर्करोगाचे अचूक निदान केले जाते व उपचार करण्याच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. केएलई कर्करोग रुग्णालय गरीब आणि गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी विमा योजना स्वीकारून विविध सरकारी उपक्रमांना हातभार लावत आहे. काही देशांमध्ये असे देणगीदार आहेत जे कर्करोगग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी पुढे येतात. मात्र, आपल्या देशात अजून हा प्रघात रुजलेला नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक साहाय्य करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.