हल्ला केल्यास युद्धच होणार !
वृत्तसंस्था /तेहरान (इराण)
अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यास पूर्ण युद्ध होईल, अशी धमकी इराणने अमेरिकेला दिली आहे. अमेरिकेने आपल्या युद्धनौकांचा एक गट इराणच्या दिशेने पाठविला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढला असून त्याचे पर्यवसान युद्धात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणनेही आता अमेरिकेला डिवचण्याचा प्रयत्न करुन तणावात भर टाकली आहे. अमेरिकेने इराणची कोंडी करण्यासाठी त्याच्या परिसरात सेनाबळ वाढविण्यास प्रारंभ केला आहे. इराणवर अमेरिकेने हल्ला केल्यास तो सहन केला जाणार नाही. आम्हीही सज्जता केली असून अमेरिकेला रोखण्याची आमची शक्ती आहे. त्यामुळे अमेरिकेचा आमच्यावर हल्ला झाल्यास इराण अनिर्बंध युद्धाची घोषणा करु शकतो. त्यामुळे अमेरिकेने विचार करावा, असे इराणच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. मात्र, अमेरिकेने आता इराणभोवती आपल्या सुरक्षा व्यवस्थेचे कडे करण्यास प्रारंभ केल्याने येत्या काही दिवसांमध्ये मध्यपूर्वेतील परिस्थिती स्पष्ट होणार आहे.