तिसरे महायुद्ध झाले तर...
गेल्या काही वर्षांमध्ये जग अनेकदा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यापर्यंत पोहचून मागे फिरलेले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांमध्ये जी प्रचंड हानी झाली, तिच्यामुळे माणसाची जीवनशैलीच विस्कटून गेली. विशेषत: दुसऱ्या महायुद्धाच्या विपरीत परिणामांच्या कृष्णछायेतून बाहेर पडण्यासाठी एक पूर्ण पिढी पालटावी लागली. त्यामुळे तिसरे महायुद्ध झालेच तर आपले काय होईल, या विचाराने अनेकांच्या मनात भीतीने घर केले आहे. अशा या संभाव्य तिसऱ्या महायुद्धाच्या विनाशातून आपले संरक्षण व्हावे, यासाठी जगातील अनेक धनाढ्यांनी भूमीच्या पोटात खोलवर प्रचंड मोठे बंकर्स निर्माण करावयास प्रारंभ केला आहे. हे बंकर्स आपण कल्पनाही करु शकणार नाही, इतके विस्तृत आणि सर्व सुखसोयींनी युक्त असे आहेत. भूमीच्या पृष्ठभागावर हे धनिक ज्या पद्धतीचे जीवन जगतात तसेच जीवन या बंकर्समध्येही जगता यावे, या दृष्टीने त्यांचे निर्माणकार्य चाललेले आहे.
जिथे एका बाजूला जगातील सर्वसामान्य माणसे आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि या जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांशी संघर्ष करण्यात गुंतली आहेत, त्याच जगात दुसऱ्या बाजूला काही अतिश्रीमंत लोक संभाव्य तिसऱ्या महायुद्धापासून स्वत:चे आणि स्वत:च्या निकटवर्तीयांचे संरक्षण करण्यासाठी भूमीच्या पोटात राजप्रासादांची निर्मिती करीत आहेत. हे निर्माणकार्य केवळ जिवंत रहावे, या एकाच भावनेने होत नसून सर्व सुखोपभोग येथेच्छ घेता यावेत, यासाठीही आहे. या बंकर्समध्ये सोने, महागडे मद्य आणि किमती पेंटिंग्ज, अलिशान कार्स, डॉलरचे गठ्ठे, मौल्यवान दगड, हिरे, मोदी आदींचे साठेही करुन ठेवण्यात येत आहेत.
स्विट्झरर्लंड या देशातील अल्पाईन पर्वतरांगांमध्ये भूमीच्या पोटात 100 मीटर खोलवर कठीण खडकांना कापून अशा एका संकुलाचे निर्माणकार्य करण्यात येत आहे. स्विस उद्योगपती थॉमस गेसर आणि त्याची कंपनी ‘ब्रुनिग मेगा सेफ’ यांच्याकडून या संकुलाची निर्मिती होत आहे. येथे 20 सुरक्षित गुहा निर्माण करण्यात येत आहेत. या स्वीस बँकेपेक्षाही अधिक सुरक्षित आणि बळकट आहेत, अशी माहिती देण्यात येते. या संकुलाचे स्थान इतके गोपनीय राखण्यात आले आहे, की पत्रकारांनाही ते महत्प्रयासाने शोधता आले आहे. कोणीही सर्वसामान्य मनुष्य याच्या आसपास फिरकू नये, याची पूर्ण दक्षता कंपनीने घेतली आहे.