For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वस्वरूपाची ओळख

06:01 AM Feb 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वस्वरूपाची ओळख
Advertisement

एखाद्या सुनसान रस्त्यावरून जर माणूस एकटा जात असेल तर तो इकडे-तिकडे बघत, अंदाज घेत भराभर पावले टाकीत जात असतो. पाचोळ्यातील वाऱ्याची सळसळ, डोक्यावरून उडत जाणारा कुणी पक्षी, स्वत:च्याच पावलांचा आवाज त्याला अस्वस्थ करतो. मनात असते ती फक्त भीती. माणूस असा स्वत:ला कां घाबरतो? कुणी ओळखीचे कां शोधत असतो? याचे कारण त्याला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख नसते. दृश्यातील ओळखीचा म्हणूनच त्याला आधार वाटतो. शरीरातील पंचकोषाच्या आत असलेला कुटस्थ आत्मा त्याला ज्ञात नसतो. त्याची शक्ती ठाऊक नसते. त्यामुळे माणूस कधी कधी स्वत:च्या सावलीला देखील घाबरतो.

Advertisement

आयुष्यात ‘ओळख’ ही व्यक्तिमत्व उजळवते किंवा काळवंडते. बरेचदा माणसे ओळख दाखवतही नाहीत. ऐहिकात जगताना स्वत:ची ओळख निर्माण करावी लागते, तर परमार्थात मोक्षवाटेवर पहिले पाऊल टाकताना व्यवहारातील ओळख पुसून टाकावी लागते. बाह्य जगात स्वत:ची ओळख करून देणारे फसवे परिचयपत्र आधी मनातून नष्ट करावे लागते तेव्हा कुठे परमेश्वराकडे जाण्याचा रस्ता सापडतो. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज करुणात्रिपदीतील एका पदात श्री दत्तप्रभूंना प्रार्थना करतात- ‘निज अपराधे उफराटी दृष्टी। होऊनी पोटी भय धरू पावन । जय करुणाघन? स्वामी म्हणतात, मुखवटाधारी स्वत:ची आणि इतरांची ओळख पुसून माझे स्वत:चे जे अपराध आहेत ते कळण्यासाठी उफराटी म्हणजे उलटी दृष्टी मला प्रदान कर. आजपर्यंत मी जनसामान्यांप्रमाणे प्रवाहात पोहत होतो. आता मला प्रवाहाच्या उलट पोहण्याची शक्ती दे. हे आत्मशोधाच्या मार्गावरचे पहिले पाऊल आहे. माणसाचा आनंद हा भौतिक सुखाकडे, शरीरभोगाकडे धावत असतो. त्याला आत वळवून स्थिर करणे म्हणजे ध्यानधारणा, नामस्मरण होय. माणसाच्या मनाचे स्तर असतात. त्यातल्या तळघरात स्मृती असतात. त्या नामस्मरण करू देत नाहीत. त्या भूतकाळाची ओळख जागी करतात आणि माणूस त्यातच रमतो. आत नामस्मरण स्थिर होण्यासाठी उफराटी दृष्टी हवी. ती स्वत:ची नवी ओळख निर्माण करते.

माणसाचे शरीर ही त्याची पहिली ओळख असते आणि ते त्याच्या निकट परिचयाचे असते. स्वत:ची छबी सतत न्याहाळायला त्याला खूप आवडते. माणसाला स्वशरीराइतके दुसरे प्रिय काहीही नसते. परंतु हे शरीर सतत क्षणोक्षणी बदलणारे आणि अस्त पावणारे आहे याची जाणीव त्याला नसते. ज्या शरीराची माणूस अहोरात्र काळजी घेतो त्या शरीरात आत नेमके काय चालले आहे याचा त्याला पत्ताच नसतो. भाकरीचा एक तुकडा मुखात गेल्यानंतर त्याचे सप्तधातूंमध्ये रूपांतर करणारा अज्ञात असतो. आणीबाणीच्या क्षणी शरीरात उलथापालथ घडवून त्याचे रक्षण करणारा कोण हा प्रश्नही त्याच्या मनाला शिवत नाही. कंठामध्ये स्वर निर्माण करून भाव व्यक्त करणाऱ्या अनोळखी आत्म्याला जाणून घ्यायला काय करावे याचे उत्तर संत मंडळी देतात.

Advertisement

माणसाचे शरीर सभोवती माणसांचा, नात्यागोत्यांचा पसारा निर्माण करते. रक्ताची, मानलेली, जातीपातीची, नोकरी-व्यवसायातली अशा असंख्य माणसांची ओळख ही शरीरामुळे होते. ‘मी म्हणजे जन्मापासून माझा असलेला हक्काचा देह’ ही ठसलेली ओळख अंतकाळी पुसून जाते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘सोईरे धाईरे, दिल्याघेतल्याचे । अंत हे काळीचे नाही कोणी?’ अखेरच्या क्षणी सारेच आप्त दूर राहून जातात. एवढेच कशाला? ‘आपुले शरीर आपणा पारिखे । परावी होतील नवल काई ?’ जे शरीर माझे म्हणत माणूस कुरवाळत राहतो त्या माणसाला अंतकाळी तेही पारखे होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे आता सोड यांची कास । धरी रे या कास । पांडुरंगाची?’ सगळी भौतिक ओळख नाहीशी करून तू पांडुरंगाला शरण जा. तोच तुझा तारणहार आहे. त्याची पक्की ओळख करून घे.

संत तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबाराय यांनी सद्गुरूप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या मांडली. संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह आणि दर्शन यासाठी त्यांनी प्रायोपवेशनाचा मार्ग निवडला. अन्नपाणी सोडले आणि रात्रंदिवस ते नामस्मरणात मग्न झाले. तेव्हा भक्तवत्सल विठाई धावून गेली. प्रेमभराने पाठीवरून हात फिरवत ग्लानी येऊन पडलेल्या निळोबांना पांडुरंगाने हळूच जागे केले. शरीरात प्राण नव्हते तरी कसेबसे डोळे उघडून बघितले तर समोर साक्षात पांडुरंग! खरे म्हणजे प्रत्यक्षात उभा ठाकलेला परमात्मा बघून निळोबांना आनंद व्हायला हवा होता. मात्र ते देवाला म्हणाले, ‘येथे तुजलागी बोलाविले कोणी? प्रार्थिल्यावाचुनि आलासी का?’ तुला काही मी बोलावले नाही, तरी तू इथे का प्रकट झालास? तुझ्या प्रल्हादासारखे माझ्यावर प्राणसंकट नाही. इथे येण्याचे फुकट का श्रम केलेस? संत निळोबा म्हणतात, ‘निळा म्हणे आम्ही नोळखूच देवा । तुकयाचा धावा करीतसे?’

पांडुरंगाला निळोबाराय म्हणतात, ‘आम्ही काही तुला ओळखत नाही. मला माझ्या सद्गुरूंचे अर्थात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे दर्शन पाहिजे.’ हा सद्गुरूमहिमा भक्तांना नवी दृष्टी देतो.

एक सांप्रदायिक भजन असे आहे-

‘ओळखिला देव संतकृपे ज्याने । धन्य त्याची जननी काय वानू ।।’  दुर्लभ अशा मानवी शरीरात ज्याला स्वस्वरूपाची ओळख सद्गुरूकृपेने होते त्याच्या आईची कुस धन्य होते. तिचा जन्म सार्थकी लागतो. तिने कष्ट सोसून जन्म दिलेल्या बाळाच्या जन्माचे सोने होते. जन्ममरणाचे चक्र पूर्ण होते आणि तो आत्मा परमात्म्यात विलीन होतो.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.