वारसास्थळ जुने गोवेची ओळख, शांती बिघडवू नका
‘सेव्ह ओल्ड गोवा’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : नव्याने येणाऱ्या बारा प्रकल्पांना विरोध,पाच हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन
पणजी : ओल्ड गोवा परिसरात येणाऱ्या सर्व मोठ्या प्रकल्पांना रोखण्यात यावे. ते पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यामुळे ओल्ड गोवाची परिस्थिती वाईट होणार आहे. ओल्ड गोव्याची ओळख पुसली जाईल, शिवाय शांतीमय वातावरण बिघडून जाणार असल्याची भीती व्यक्त करणारे निवेदन ओल्ड गोवा वाचवा कृती समितीतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर करण्यात आले आहे. ओल्ड गोव्यात एकूण 12 प्रकल्प येणार आहेत. ते स्थानिक लोकांना नको म्हणून त्यांना विरोध करण्यात आला आहे. ओल्ड गोव्याचे अस्तित्त्व कायम राखण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन आखण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर जागा वारसा स्थळ असून तेथील चर्च म्हणजे प्रार्थनास्थळ असल्याने शांतता असणे आवश्यक आहे.
मात्र मोठे प्रकल्प साकार झाल्यास तेथील शांतीचा भंग होईल, म्हणून स्थानिक लोकांचा विरोध असल्याचे कृती समितीच्या पदाधिकारी जेनिफर लोबो यांनी सांगितले. हे प्रकल्प आम्ही करू देणार नाही म्हणून ते रद्द करावेत अशी मागणी त्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मास्टर प्लॅन लवकरात लवकर झाला पाहिजे. त्याला उशीर करू नका, अशी याचनाही निवेदनात करण्यात आली आहे. सोबत सुमारे 5000 स्थानिक ग्रामस्थांच्या सह्या जोडण्यात आल्या आहेत. गोव्यातील तमाम जनतेने ओल्ड गोव्याचे महत्त्व राखून ठेवण्यासाठी समितीच्या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. पर्वरी येथील मंत्रालयात जाऊन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.