For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पायलटवरील हल्ल्यातील आरोपीची ओळख उघड

06:58 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पायलटवरील हल्ल्यातील आरोपीची ओळख उघड
Advertisement

हमाम अल-हमामी असे नाव : ओमानचा रहिवासी : अल-कायदाच्या प्रभावाखाली असल्याचेही उघड

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

इस्रायलला जाणाऱ्या फ्लाय-दुबईच्या विमानात भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाची ओळख हमाम अल-हमामी अशी पटली आहे. तो ओमानचा रहिवासी आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, तपासात त्याच्यावर अल-कायदाच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचे पुरावे सापडले आहेत. चौकशीदरम्यान आपल्याला इस्रायलमध्ये विमान पाडायचे होते, अशी कबुली अल-हमामीने दिल्याचे सांगण्यात आले. आता अजूनही त्याची सखोल चौकशी सुरू असून त्याने या हल्ल्याची तयारी कोणाच्या इशाऱ्यावरून केली यासंबंधीची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Advertisement

हल्ल्यापूर्वीही अल-हमामी याच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. 2024 मध्ये, त्याच्या कट्टर विचारांमुळे त्याला ओमानच्या राष्ट्रीय विमान कंपनीतील वैमानिक प्रशिक्षणातून काढून टाकण्यात आले होते. नंतर त्याला विमान कंपनीतच एक वेगळी भूमिका देण्यात आली. तो सुमारे आठ महिन्यांपूर्वी फ्लाय-दुबईमध्ये रुजू झाला होता.

सीरियामध्ये असताना कट्टरपंथी विचारांनी प्रभावित

अल-हमामीने ओमानबाहेर बराच काळ घालवला होता आणि तो सीरियामध्येही बराच काळ राहिला होता. या काळात तो कट्टरपंथी विचारांनी प्रभावित झाला. तपासात त्याच्या काही धार्मिक व्यक्तींसोबतच्या भेटींची माहितीही समोर आली आहे. तो कट्टरपंथी विचारांनी कसा प्रभावित झाला, हे शोधण्याचा तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर, अल-हमामीला सौदी अरेबियातून यूएईमध्ये नेण्यात आले असून तिथे सध्या त्याच्यावर दहशतवादाशी संबंधित आरोपांखाली तपास सुरू आहे.

फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, ओमान एअरने 2024 मध्ये अल-हमामीला विमान उ•ाणापासून काढून टाकले होते. तो कट्टर इस्लामी वेबसाइट्स पाहत असल्याची माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सीएनएनच्या वृत्तानुसार, त्याच्या कथित कट्टरपंथी विचारांमुळे त्याला पायलट प्रशिक्षणातून काढून टाकण्यात आले होते. तथापि, नंतर त्याला एअरलाइनमध्ये दुसरी भूमिका देण्यात आली. त्याने यापूर्वी रॉयल एअर मारोकमध्येही काम केले होते.

विमान इस्रायलमध्ये पाडण्याची योजना

अहवालानुसार, अल-हमामी याच्याकडे ‘फ्री पॅलेस्टाईन’ पोस्टर्स आणि पॅलेस्टाईन-समर्थक इतर वस्तू सापडल्या. चौकशीदरम्यान, त्याने इस्रायलमध्ये विमान पाडल्याचे कबूल केले. कॅप्टनवरील हल्ला हा विमान ताब्यात घेऊन ते जाणूनबुजून पाडण्याच्या प्रयत्नाचा भाग होता का, याचा तपास यंत्रणा करत आहेत. तसेच अल-हमामीने तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात सह-वैमानिकाचे पद कसे मिळवले, हा तपासातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इस्रायलची शिन बेट, मोसाद, लष्कर आणि परिवहन मंत्रालय यांसारख्या अनेक यंत्रणा या पैलूचा तपास करत आहेत. अल-हमामी विमान कर्मचाऱ्यांचा भाग कसा बनला, हे ते निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्मित मच्छारच्या प्रकृतीत सुधारणा

फ्लायदुबईच्या भारतीय वैमानिकाच्या प्रकृतीबद्दल यूएईकडून अद्ययावत माहिती शनिवारी जारी करण्यात आली. कॅप्टन स्मित मच्छार वेगाने बरे होत आहेत. परराष्ट्र मंत्रालय आणि संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावासाने शनिवारी त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स जारी केले. कॅप्टन मच्छर यांना ‘उत्कृष्ट वैद्यकीय उपचार’ मिळत असल्याचे सांगण्यात आले. भारतीय परराष्ट्र मंत्रालय त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. स्मित मच्छार यांना पुरवण्यात येत असलेल्या वैद्यकीय सुविधांबद्दल आम्ही संयुक्त अरब अमिराती सरकारचे आभारी आहोत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Advertisement

.