For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑनलाईन फ्रॉड ओळखा, लुबाडणूक टाळा!

07:00 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑनलाईन फ्रॉड ओळखा  लुबाडणूक टाळा
Advertisement

फसवणूक करणाऱ्यांचे नव-नवे फंडे : बँका-वित्तसंस्थांकडून लोकांना सावध राहण्याची सूचना

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

बहुराष्ट्रीय कंपनीच्या एका माजी व्यवस्थापकीय संचालकाला ऑनलाईन पद्धतीने 4.8 कोटी रुपयांना लुबाडण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली आहे. ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांनी गेल्या एक वर्षात लोकांना लुबाडण्याच्या दोन नव्या पद्धती शोधून काढल्या आहेत, असे या मोठ्या फ्रॉडवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे बँकांनी, तसेच वित्तसंस्थांनी लोकांना सावध राहण्याची सूचना केली आहे. फ्रॉड करण्याचा एक प्रकार युजर्सना काही साध्या कृती करावयास लावून नंतर हातोहात त्यांची फसवणूक करण्याचा आहे. या प्रकारानुसार युजर्सना काही बाबींवर त्यांची मते फेसबुकवर लिहिण्यास सांगितले जाते. किंवा युट्यूबवर एखादा व्हिडीओ क्लिक करण्यास सांगण्यात येते. अशा साध्या कृती करण्यासाठी त्यांना मोठ्या बक्षिसांचे आमिष दाखविले जाते. त्यांनी तसे केल्यानंतर त्यांना बक्षीस लागल्याचे खोटे संदेश येतात. बक्षिसाच्या मोहात पडून युजर त्या संदेशांप्रमाणे कृती करतो आणि बँकेतील आपले पैसे गमावून बसतो. अशी अनेक उदाहरणे आहेत.

Advertisement

सीबीआयची धमकी

दुसरा प्रकार श्रीमंत लोकांना सीबीआयची धमकी दाखविण्याचा आहे. ‘तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे. त्यात प्रतिबंधित वस्तू आहेत. ते पार्सल सीबीआयच्या हाती पडले आहे. त्यामुळे तुम्हाला त्वरित अटक होण्याची शक्यता आहे, असा संदेश दिला जातो. याला घाबरुन कित्येक लोक सीबीआयची ब्याद टाळण्यासाठी संदेश देणारा जे सांगतो ते करण्यास तयार होतात. यातून अशा लोकांच्या बँक खात्यांची माहिती मिळविली जाते आणि त्यांना लुटले जाते.

व्हिडीओ अॅप डाऊनलोड

सीबीआयची भीती दाखवून लोकांना एक विशिष्ट अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले जाते. हे अॅप प्रामुख्याने स्कायपेचे असते पण त्याला सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या स्वरुपात दाखविले जाते. त्यावर बनावट लोगो असतात. या अॅपच्या माध्यमातून त्याला त्याची बँक खाती, आर्थिक व्यवहार इत्यादींची माहिती उघड करण्यास भाग पाडले जाते आणि त्याची बँक खाती खाली केली जातात.

व्यवस्थापकाच्या संबंधात काय घडले

बहुराष्ट्रीय कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला अशाच प्रकारे सीबीआयची भीती दाखविण्यात आली. त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्याच्या आर्थिक व्यवहाराचा संशय रिझर्व्ह बँकेला आला आहे, असे भासविण्यात आले. या कचाट्यातून सुटायचे असेल तर त्वरित तुझ्या पत्नीच्या बँक खात्यावर 1 कोटी रुपये जमा कर असा धाक घालण्यात आला. तथापि, त्याने वेळीच सावध होऊन आपल्या ब्रिटनमधील मुलाचा त्याने सल्ला घेतला. त्यामुळे त्याला या घोटाळ्याची कल्पना आली. म्हणून तो बचावला. तथापि, त्याने या प्रकारासंबंधी ठाणे पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली असून आता तपास केला जात आहे.

काय करणे आवश्यक...

  • कोणत्याही ऑनलाईन संदेश/लिंकवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका
  • अनोळखी व्यक्तीने काही ऑनलाईन कृती सांगितली तर करू नका
  • कोणत्याही परिस्थितीत बँक खात्यांची माहिती ऑनलाईन देऊ नका
  • पासवर्ड, ओटीपी नंबर कोणालाही सांगू नका किंवा शेअर करू नका
  • सीबीआय किंवा तत्सम संदेश आल्यास त्याप्रमाणे कृती करू नका
  • कोणत्याही अॅपवर, व्हिडीओवर खात्री पटल्याशिवाय क्लिक करू नका
  • शंका वाटल्यास ऑनलाईन व्यवहार करण्याआधी पोलिसांना कळवा
Advertisement
Tags :

.