For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिग्गज ‘त्रिमूर्ती’ला आदर्श ‘निरोप’ !

06:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिग्गज ‘त्रिमूर्ती’ला आदर्श ‘निरोप’
Advertisement

‘टी-20’ विश्वचषक जिंकून परतलेल्या भारतीय संघाचं काल जंगी स्वागत झालं अन् ते साहजिकच होतं...2007 नंतर हे ‘टी-20’ विश्वविजेतेपद मिळालेलं असल्यानं त्याचं अप्रुप भारी...त्याशिवाय हा किताब जास्तच खास राहिलाय तो या प्रकाराला ‘रामराम’ म्हटलेल्या विराट कोहली, रोहित शर्मा नि प्रशिक्षक राहुल द्रविड या दिग्गज त्रिमूर्तीसाठी...

Advertisement

भारतीय संघ जेव्हा अपेक्षेप्रमाणं ‘टी-20’ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडकला तेव्हा अनेक रसिकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती...कारण या स्पर्धेतील त्यांची मोहीम हुबेहूब गेल्या वर्षी भारतात झालेल्या 50 षटकांच्या सामन्यांतील घोडदौडीप्रमाणं राहिली...तसाच त्यांचा विजयरथ सुसाट सुटला, तसंच त्यांनी विविध संघांना संधी देखील न देता आडवं केलं अन् निर्विवाद वर्चस्व गाजविलं. भारताला धडपडत जिंकावं लागलंय असं चित्र कधी दिसलंच नाही...फरक होता तो इतकाच की अंतिम फेरीत त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया नव्हती. कारण त्यांनाही आपण उपांत्यपूर्व फेरीत धूळ चारलेली...

असं असलं, तरी हेन्रिक क्लासेन अन् डेव्हिड मिलर या ‘हिटर्स’ची जोडी जमली तेव्हा लढत आपल्या हातून निसटतेय असंच वाटू लागलं होतं. क्लासेनचा अडथळा हार्दिक पंड्यानं दूर केला नसता आणि सूर्यकुमार यादवनं मिलरचा तो झेल सीमारेषेवर अफलातून पद्धतीनं पकडला नसता, तर पराभव ठरलेलाच होता...परंतु तो दिवस भारताचा होता...मायदेशातील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हरल्याच्या जखमेवर व्यवस्थित लेप लावणारं हे ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेचं दुसरं जेतेपद...13 वर्षांनंतर आपल्याला एखाद्या ‘आयसीसी’ स्पर्धेचा किताब पटकावता आलेला. त्यामुळं त्याचं आणखी अप्रुप...

Advertisement

पण हे यश जास्तच खास राहिलं ते तीन दिग्गजांसाठी...कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व प्रशिक्षक राहुल द्रविङ...विराटनं आपली ही शेवटची ‘टी-20’ स्पर्धा असल्याचं आधीच सांगून टाकलं होतं. रोहितनं विजेतेपदानंतर क्रिकेटच्या या प्रकारातून निवृत्तीची केलेली घोषणा ही देखील अपेक्षित अशीच घडामोड...आणि द्रविडचा हा शेवटचा डाव असल्याचं ठरलेलंच होतं...पण निरोप अशा शानदार पद्धतीनं घेण्याचं भाग्य खूप थोड्यांना मिळतं...

रोहित शर्मा दोनदा ‘टी-20’ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिलेल्या वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल बद्री, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, ख्रिस गेल, दिनेश रामदिन, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी आणि मार्लन सॅम्युअल्सच्या पंक्तीत जाऊन बसलाय. तर अंतिम लढतीत सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीची ‘टी-20’मध्ये हा मान मिळविण्याची ती विक्रमी 16 वी खेप. त्यापैकी 8 सामनावीर पुरस्कारांची नोंद ही विश्वचषक स्पर्धांत झालेली. शिवाय त्याच्या खात्यात ज्या चषकाची उणीव भेडसावत होती ती दूर झाली...

टी-20 क्रिकेटच्या सुऊवातीच्या स्वरूपाभोवती जे एक जादुई वलय होतं ते गडद करण्यात जर विराट कोहलीनं मोलाचं योगदान दिलेलं असेल, तर रोहितनं त्याच्या आग ओकणाऱ्या अवताराला न्याय दिलाय असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये...या विश्वचषकात त्या दोघांना एकत्र पाहणं हा फार सुखद अनुभव होता. रोहितनं या प्रकाराला ‘अलविदा’ म्हटलंय ते त्यातील सर्वांत जास्त धावा करणारा फलंदाज बनून (159 सामन्यांमध्ये 4231 धावा) आणि कोहली देखील त्याच्याहून फार मागं नाही (125 लढतींत 4188 धावा). या दोघांनी मिळून आपल्या कारकिर्दीत एकूण 8419 धावा जमविल्या...

विराट कोहली व रोहित शर्माची निवृत्ती ही आधी म्हटल्याप्रमाणं पूर्णपणे अनपेक्षित नव्हती. भारताला 2022 मधील ‘टी-20’ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडपुढं हात टेकावे लागल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी या प्रकारातून अंगच काढून घेतलं होतं. त्यांनी पुनरागमन केलं ते यंदाच्या जानेवारीमध्ये, ‘टी-20’ विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करूनच...

या स्पर्धेनं परिस्थितीची पर्वा न करता तुटून पडण्याच्या रोहितच्या रणनीतीचं दर्शन पुन्हा एकदा घडविलं. सेंट लुसियामध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध त्यानं केलेली 92 धावांची खेळी ही या स्पर्धेतील तिसरी सर्वोच्च धावसंख्या, तर इंग्लंडविऊद्धच्या त्याच्या महत्त्वपूर्ण 57 धावांमुळं भारताला उपांत्य फेरीत कठीण खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारता आली...दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या अंतिम लढतीत केशव महाराजाविऊद्ध पसंतीचा ‘स्वीप शॉट’ मारण्याच्या प्रयत्नात तो भलेही दुसऱ्याच षटकात परतलेला असेल, पण स्पर्धेतील ‘पॉवरप्ले’मध्ये रोहितचा ‘स्ट्राइक रेट’ सातत्यानं 140 च्या वर राहिला. बहुतेक वेळा डावाला अपेक्षित वेग मिळू शकला तो त्यामुळंच (या विश्वचषकात रोहित शर्मानं 157 च्या ‘स्ट्राईक रेट’नं 257 धावा जमविल्या. त्यात त्यानं लगावले ते 15 षटकार)...

रोहितचा सलामीचा जोडीदार विराट कोहलीलाही या आक्रमक शैलीचा फायदा झाल्याशिवाय राहिला नाही (विराटला डावाच्या सुरुवातीस पाठविण्याचं धोरण हे ‘आयपीएल’मधील त्याच्या सलामीवीराच्या भूमिकेतील यशातून जन्मलेलं). त्याला त्यामुळं वेग वाढवण्यापूर्वी परिस्थितीचं आकलन करण्यास वेळ मिळाला...अर्थात या विश्वचषकात त्याच्याकडून सातत्यानं निराशाच झाली होती. त्याची तीव्रता आणखी जास्त राहिली ती ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील विराटचा विलक्षण धडाका ताजा असल्यामुळं...सात डावांमध्ये त्याला जमविता आल्या होत्या त्या केवळ 75 धावा (1, 4, 0, 24, 37, 0 आणि 9). पण अत्यंत महत्त्वाच्या नि गरजेच्या वेळी कोहलीनं मदतीला धावून येत त्यापेक्षा जास्त धावा (76) त्या एकाच अंतिम डावात फटकावल्या...

पांढऱ्या चेंडूच्या, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील विराट कोहलीची सर्वांत मोठी ताकद म्हणजे लक्ष्याला आटोक्यात आणण्याची क्षमता. मात्र ‘टी-20’ क्रिकेटच्या वेगवान उक्रांतीनं त्याला काहीसं अडचणीत आणलं. त्यातील कमालीच्या ‘स्ट्राइक रेट’ची मागणी आणि कमी जोखीम घेण्याचा दृष्टिकोन यामुळं त्याची अलीकडच्या वर्षांतील या प्रकारातील कामगिरी तितकी तेजस्वी राहिली नाही. अपवाद 2022 च्या ‘टी-20’ विश्वचषकामध्ये मेलबर्नवर पाकिस्तानविऊद्ध त्यानं 53 चेंडूंत फटकावलेल्या 82 धावा किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 59 चेंडूंतील 76 धावांची ताजी खेळी...वयाच्या 35 व्या वर्षी अनेक शिखरं सर केल्यानंतर देखील आधुनिक ‘टी-20’च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विराटनं स्वत:च्या मर्यादांना खेचणं, त्यात सर्वोत्तम ठरण्याची आपली इच्छा दाखवून देणं हे निश्चितच सलाम करण्याजोगं...

दुसरीकडे, रोहित शर्माची कामगिरी ही टी-20 क्रिकेट गेल्या दशकभराच्या तुलनेत मागील तीन वर्षांत अधिक बदललंय याची साक्ष आणून देणारी. त्याचा पवित्रा हा संघाच्या पारंपरिक दृष्टिकोनास छेद देणारा. कारण सुरुवातीला फलंदाज टिकवून ठेवत संथपणे सुरुवात करायची अन् शेवटच्या षटकांमध्ये ‘हल्लाबोल’ करायचा ही या प्रकारातील भारताची ठरलेली रणनीती...पण जेव्हा जेव्हा त्यात बदल करून सुऊवातीपासूनच झपाटा लावण्याची गरज भासली तेव्हा तेव्हा त्याच्या केंद्रस्थानी राहिला तो रोहितच...

रोहित शर्मा व विराट कोहलीसह साऱ्या संघानं प्रशिक्षक राहुल द्रविडनाही दिली ती निरोपाची जबरदस्त, संस्मरणीय भेट...त्यामुळं त्यांच्या खात्यात सुद्धा ज्याची कमतरता होती तो विश्वचषक जमा झाला. ‘दि वॉल’ म्हणून ओळखल्या गेलेल्या, खेळाडू म्हणून नेत्रदीपक कारकीर्द राहिलेल्या द्रविड यांचा 2003 मध्ये एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघात समावेश होता. परंतु तिथं त्यांना ऑस्ट्रेलियापुढं नमतं घ्यावं लागलं. 2007 मध्ये तर नेतृत्वाची धुरा होती ती खुद्द त्यांच्याचकडे. पण भारतावर त्यावेळी साखळी फेरीही पार करता न येण्याची नामुष्की ओढवली होती. ती स्पर्धा झाली होती नेमकी वेस्ट इंडिजमध्येच...त्याच भूमीत हे खेळाडू म्हणून नसलं, तरी प्रशिक्षक या नात्यानं मिळालेलं यश अधिकच सुखावणारं...

या पार्श्वभूमीवर विराट कोहलीनं आणून दिलेला चषक हाती घेतल्यानंतर राहुल द्रविडनी केलेला जल्लोष हा त्यांच्या इतका काळ लोकांपासून दडविलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणारा...51 वर्षीय द्रविडकडे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती ती सुमारे तीन वर्षांपूर्वी, रवी शास्त्राrंचा कार्यकाळ संपल्यानंतर. त्यांच्याकडून अपेक्षा खूप होत्या अन् त्यांना ते जागले असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही...

आकडेवारी आणि कामगिरीच्या विचार करता राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखालील ‘टीम इंडिया’ जगातील अव्वल कामगिरी करणारा संघ राहिला. भारतानं या कालावधीत 56 पैकी 41 एकदिवसीय सामने आणि 69 टी-20 पैकी 48 लढती जिंकल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघानं गमावली ती एकमेव कसोटी मालिका. बदल्यात त्यांनी पाच मालिका खिशात घातल्या अन् दोन अनिर्णीत राखल्या...एकंदरित पाहता भारताची कामगिरी जगातील इतर सर्व संघांना मागं टाकणारी, वर्चस्व गाजवणारी ठरली...

खेरीज दक्षिण आफ्रिकेविऊद्धची लढत हा गेल्या 12 महिन्यांतील ‘आयसीसी स्पर्धां’तील भारताचा सलग तिसरा अंतिम सामना...जूनमध्ये रोहित शर्माचा संघ उतरला होता तो ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम फेरीत. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत....भारतीय संघाची सूत्रं हाती घेण्यापूर्वी द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख तसंच 19 वर्षांखालील अन् भारत ‘अ’ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसले होते. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील संघाचे प्रशिक्षक होते ते द्रविडच...आता ते क्रिकेटमधून काही वर्षांचा ‘ब्रेक’ घेण्याची चिन्हं दिसताहेत. त्यानंतर ते ‘एनसीए’मध्ये परतून कनिष्ठ क्रिकेटपटूंना घडविण्याचं काम पुन्हा सुरू करू शकतात. राहुल द्रविडच्या कार्यपद्धतीविषयी काही बाबतीत भलेही असहमती असली, तरी त्यांना सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक म्हणून निश्चितच लक्षात ठेवले जाईल...

2026 मधील टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार ती भारतीय भूमीत. त्यावेळी ना विराट कोहली, रोहित शर्मा असेल ना राहुल द्रविङ...जेतेपद राखून ठेवण्याची अन् त्यांचा वारसा चालविण्याची जबाबदारी असेल ती ‘यंग ब्रिगेड’वर आणि नव्या प्रशिक्षकांवर !

टी-20 मध्ये रोहित शर्मा...

  • स्वरुप     सामने     धावा       सर्वोच्च   सरासरी  शतकं     अर्धशतकं             स्ट्राईक रेट            षटकार
  • खेळाडू म्हणून       159        4231      नाबाद 121            32.05     5             32           140.89   205
  • कर्णधार म्हणून     62           905        नाबाद 121            34.01     3             13           149.76   105

‘टी-20’ मध्ये विराट कोहली...

  • सामने     नाबाद    धावा       सर्वोच्च   सरासरी  स्ट्राईक रेट            शतकं     अर्धशतकं             षटकार
  • 125        31           4188      122        48.7       137.04   1             38           124

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.