Kolhapur News : इचलकरंजीत कलाविष्काराने उपस्थितांचे हृदय टाकले भारावून ; विद्यार्थ्यांची दिव्यांगत्वावर मात
इचलकरंजीत दिव्यांग विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर नृत्य
इचलकरंजी : मराठमोळ्या गाण्यासह अंगावर रोमांचआणण्याऱ्या देशभक्तीपर गीतांचे आणि त्यावर लक्षवेधी नृत्याविष्कार येथील दिव्यांग मुलांच्या कडून सादर झाला. येथील जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित सन्मती बौद्धिक अक्षम मुलांची शाळा सन्मती व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र तसेच दिशा अध्ययनक्षम मुलांची शाळा त्यांच्या वतीने 33 व्या वार्षिक स्नेहसंमेलनात दिव्यांग मुलांनी अनोखा अनिश अविष्कार सादर केला.
जैन संस्कृतिक व शैक्षणिक मंडळ तसेच लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कन्या महाविद्यालयाच्या प्रा संगीता पाटील व लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष युगराज कित्तुरे हे होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी.जे. बडबडे होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ डी एस बरगाले डॉ के एम मगदूम, विद्यमान उपाध्यक्ष मधुकर मणेरे, नूतन नगरसेवक अभिषेक वाळवेकर, नृत्य विशारद सायली होगाडे, खजिनदार रवींद्र पाटील, सेक्रेटरी संजय कोले यांच्यासह सर्व संचालकांची उपस्थिती होती.
स्वागत सन्मती बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेच्या अध्यक्षा निर्मला ऐतवडे यांनी केले तर आभार समन्वयक सुभाष चिंचवडे यांनी मानले.दिव्यांग असूनही विद्यार्थ्यांचा कलाविष्कार दाखवण्यासाठी केलेली धडपड पालकांचा त्यासाठीचा उत्साह आणि सादरीकरणानंतर मिळालेली दाद यामुळे हा सांस्कृतिक कार्यक्रम एक आगळावेगळा ठरला. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या गीतावर उत्कृष्ट असा नृत्य मुलांनी सादर केला. कोल्हापुरी ठसकेबाज गाण्यावर मुलांनी सादर केलेली आगळीवेगळी अदा उपस्थितितांची मन भारावून घेणारे ठरले. भारतीय संस्कृतीची परंपरा असलेल्या अनेक गीतावर मुलींनी नृत्य सादर केले.
विशेष म्हणजे अनेक विद्यार्थी हे दिव्यांग होते व त्यांना व्यासपीठावर उभाही राहता येत नव्हते त्यांचे पालक व शिक्षकांनी व्यासपीठावर त्यांना आधार देत त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात रममान होण्याची संधी दिली यामुळे अनेक जण भारावून गेले.ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून देशभक्तीपर गीत आणि नृत्याचा वेगळा अविष्कार मुलांनी सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली कला त्यांच्यातील दिव्यांगत्व पूर्णपणे बाजूला ठेवणारे होते. रिमिक्स गाण्यावरही अनेक मुला मुलींनी नृत्य सादर केले.
या कार्यक्रमात विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला अनेक विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत धडक मारली आहे त्यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात झाला. या विद्यार्थ्यांना कला सादर करण्यासाठी प्रशिक्षण देणारे प्रशिक्षिका सायली होगाडे यांच्यासह अनेक कलाकारांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. येथील लायन्स क्लब सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.