अपमानाचा राग मनात धरला अन् झोपलेल्या पतीवर खलबत्त्याने हल्ला ; पत्नीने केला पतीचा रक्तरंजित शेवट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बुरसे याचा तारदाळ येथील वैशाली हिच्याशी विवाह झाला होता. सागर मद्यपान करत असल्याने दोघांमध्ये वारंवार कौटुंबिक वाद होत होते. या वादांमुळे काही वर्षांपूर्वी ते विभक्त झाले होते. त्यानंतर वैशालीने दुसरा विवाह केला; मात्र घटस्फोट झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी सागर आणि वैशाली पुन्हा एकत्र राहू लागले होते.
शनिवारी रात्री सागरने मद्यपान केले होते. यावेळी त्याने पत्नी वैशालीला अपमानास्पद बोलल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघे झोपी गेले. मात्र, झालेल्या अपमानाचा राग मनात धरून वैशालीने झोपलेल्या सागरच्या डोक्यात खलबत्त्याने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सागरचा मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर सकाळी पोलीस ठाणे गाठले
सागरची हत्या केल्यानंतर वैशाली घरातच राहिली. सकाळी दिनक्रम आटोपल्यानंतर तिने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर ती नातेवाईकांसह थेट गावभाग पोलीस ठाण्यात पोहोचली. पतीची हत्या केल्याचे तिने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली.
या प्रकरणी सागरची बहीण गायत्री गणेश रायबागकर (वय 37, रा. यड्राव, ता. शिरोळ) यांच्या फिर्यादीवरून वैशालीविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. पोलिसांनी वैशालीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.