For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Election 2025: भाजपच्या अंतर्गत वादाची इचलकरंजीत झलक, विसर्जन मिरवणुकीत थेट संकेत

01:00 PM Sep 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
election 2025  भाजपच्या अंतर्गत वादाची इचलकरंजीत झलक  विसर्जन मिरवणुकीत थेट संकेत
Advertisement

महापालिका निवडणुकीत होणाऱ्या राजकीय उलथापालथीचा श्रीगणेशा झाला

Advertisement

इचलकरंजी : इचलकरंजी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी महायुतीमधील घटक पक्षांनी वेगवेगळे स्वागत कक्ष उभारले. सुरवातीच्या मानाच्या गणपती पूजनासाठी माजी आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांची ठळकपणे अनुपस्थिती जाणवली व त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनाट्या रंगले.

यानिमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीत होणाऱ्या राजकीय उलथापालथीचा श्रीगणेशा झाला असल्याच्या चर्चांना उत आला असून आतापर्यंत पक्षकार्यालयात असलेला संघर्ष प्रथमच उंबऱ्याबाहेर जाणवला आहे. इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक आता काही महिन्याच्या अंतरावर येवून ठेपली आहे.

Advertisement

प्रभागरचनेचा आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील राजकीय घडामोडींना उत आला आहे. युती-आघाडीमधील नेत्यांमध्ये सुरु असलेले शीतयुध्द आता पक्षकार्यालयाच्या चौकटी सोडून बाहेर दिसू लागले आहे. याची पहिली झलक शहरात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीत दिसून आली व या निमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीत काय राजकीय घडमोडी घडणार आहेत, याचा अंदाजही उपस्थितांना आला आहे.

भाजपा-शिवसेनेचे वेगवेगळे स्वागत कक्ष गतवेळी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून भाजपा व शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्रित निवडणुक लढवत खासदार व आमदार निवडून आणले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोनही बाजूंकडून स्वबळ आजमावण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी वरिष्ठाकडे केली होती.

सध्या यामध्ये पॅचअप झाल्याचे वाटत असताना अचानकपणे विसर्जन मिरवणुकीवेळी या दोनही पक्षांनी वेगवेगळे स्वागतकक्ष उभारले. गतवर्षी या दोन्ही पक्षांनी एकत्रित स्वागतकक्ष उभारले असताना यंदा महापालिका निवडणूक, महापौरपद या पार्श्वभूमीवर स्वबळाचा झलक दाखवली जात आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आवाडे-हाळवणकर गटातील विसंवादाची झलक माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपा प्रवेश केल्यापासून ते त्यांचे पुत्र राहूल आवाडे यांच्या आमदारकीच्या प्रवासापर्यंत आवाडे-हाळवणकर गटातील विसंवादाचे अनेक प्रकार समोर आले. पण अनेकदा हे पक्ष कार्यालयापुरते सिमित राहिले.

यावेळी मात्र विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने ते उघड झाल्याचे बोलले जात आहे. भाजपाने उभारलेल्या स्वागतकक्षाचे उद्घाटन सकाळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते झाले, पण त्यानंतर आमदार राहूल आवाडे यांच्या हस्तेही पुन्हा उद्घाटन करण्यात आले. तसेच विसर्जन मिरवणुकीची सुरुवात ज्या मानाच्या गणपतीच्या पालखीने होते, त्याला शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित असताना माजी आमदार सुरेश हाळवणकरांची मात्र अनुपस्थिती जाणवली.

विशेष म्हणजे, यावेळी भाजपाचे काही प्रमुख पदाधिकारीही अनुपस्थित राहिले. माजी आमदारांना निमंत्रण देण्यास विसरले का ? त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनाट्या सुरु झाल्याची चर्चा मात्र त्यानंतर रंगली होती.राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदलाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने गतवेळी माजी सभापती विठ्ठल चोपडे यांनी स्वागतकक्ष उभारला होता.

यावेळी राष्ट्रवादीमध्ये नव्याने दाखल झालेले माजी आमदार अशोकराव जांभळे व त्यांचे पुत्र जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी त्या ठिकाणी स्वागतकक्ष उभारला होता. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विठ्ठल चोपडे यांची अनुपस्थिती जाणवत होती. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्वागतकक्षाकडून दरवर्षी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत पांढऱ्या टोप्या देवून होत होते, पण यावेळी मात्र ते भगव्या टोप्या देवून झाल्याने हा सुद्धा चर्चेचा विषय बनला होता.

Advertisement
Tags :

.