Ichalkaranji Politics: महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी, उमेदवारावरच ठरणार लढतीचे चित्र
काही उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीला आतापासूनच लागले आहेत
By : राजेंद्र जगदेव
कबनूर : प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्ष स्थापन करून स्वतंत्रपणे जिल्हा परिषद व विधानसभा निवडणूक लढवली. सध्या ते भाजपमध्ये आहेत. या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असले तरीही भाजप पक्षाचा उमेदवार हा आवाडे गटाला मिळणार की सुरेश हाळवणकर गटाला मिळणार, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीआधी कबनूर नगरपरिषद होणार की निवडणुकीनंतर होणार हे अजून फिक्स झाले नसले तरीही काही उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीला आतापासूनच लागले आहेत. कबनूर हा लोकसंख्येने आणि विस्ताराने मोठा मतदारसंघ झाला आहे.
गावची लोकसंख्या 80 हजारांहून अधिक असेल, तरीही 2011 च्या जनगणनेनुसार या मतदारसंघामधील मतदारांची संख्या अंदाजे 38 हजाराच्या घरात आहे. 2012 पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर काँग्रेसला गळती लागली.
सन 2012 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पुरस्कृत आघाडीच्या वतीने सर्वसाधारण प्रवर्गातून विजया पाटील यांनी प्रतिस्पर्धी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगल काडाप्पा यांचा पराभव केला. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी प्रभागातून ताराराणी पक्ष आघाडीच्या कांता बडवे यांच्या विरुद्ध भाजपच्यावतीने उभा राहून दुसऱ्यांदा विजया पाटील यांनी विजय खेचून आणला.
या मतदारसंघात भाजपचा प्रभाव असला तरीही भाजपमध्ये प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर या दोन मातब्बर नेत्यांमुळे आवाडे की हाळवणकर यांच्यापैकी कुणाला जागा सोडली जाणार यावर भवितव्य अवलंबून असणार आहे. एकेकाळी या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते.
आता त्या वर्चस्वाला गळती लागली आहे. कारण स्थानिक पातळीवर काँग्रेसमध्ये तसा नेता नसल्यामुळे काँग्रेसला महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढवावी लागेल. सध्या वैशाली कदम, सुधीर लिगाडे, बाळासाहेब माने, प्रमोद पाटील, विजया पाटील या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच होण्याची शक्यता आहे.
नगर परिषदेसाठी हालचाली
कबनूर नगरपरिषदेसाठी 10 वर्षे झाली लढा चालू आहे. अद्यापही या लढ्याला यश आलेले नाही. नगरपरिषदेसाठी न्यायालयात धाव घेण्याच्या हालचाली कृती समितीकडून चालू आहेत. जिल्हा परिषद निवडणूक होऊ घातली आहे. नगर परिषदेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.
भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी
या मतदारसंघात भाजपची ताकद असल्यामुळे आणि त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकंदरीत पाहता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.