Political News: भाकरी फिरवली पण गटबाजीमुळे करपली, काय आहे इंचलकरंजीतील राजकीय परिस्थिती?
प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी निवडीनंतर गटबाजीचे दर्शन होत आहे
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी रेंगाळलेल्या पदाधिकारी निवडी जाहीर केल्या आहेत. यामध्ये जुन्यांसह नव्याने पक्षात आलेल्यांनाही संधी दिली आहे. पण, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी निवडीनंतर गटबाजीचे दर्शन होत आहे.
काहीवेळा उघडपणे तर अनेकदा खासगीत याबाबत कार्यकर्ते संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे पक्ष एकसंध राहण्यासाठी भाकरी फिरवली पण कार्यकर्त्यांच्या नाराजीतून उद्भवलेल्या गटबाजीमुळे ती करपली, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर यावर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पहिला महापौर, उपमहापौर तसेच नगरसेवक आपल्याच पक्ष, आघाड्यांचा होण्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली जात आहे.
यामध्ये कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी तसेच पक्ष एकसंध ठेवून निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पक्षपातळीवरील पदाधिकारी निवडीच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. यामध्ये सुरवातील भाजप आणि त्यांनतर राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीमधील पक्षांनी पदाधिकारी निवडी जाहीर केल्यात.
या निवडी जाहीर झाल्यानंतर पक्ष एकसंध होऊन बळकट होण्याऐवजी गटातटात संघर्ष निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने रखडलेल्या मंडल अध्यक्षपदाच्या निवडी जाहीर केल्या. एका जागेबाबत आवाडे-हाळवणकर गटात रस्सीखेच असल्यामुळे लवकर निवडी जाहीर झाल्या नसल्याची चर्चा होती.
आश्चर्याची बाब म्हणजे या मंडल अध्यक्षांनी ज्यांना निवडून द्यायचे, त्या प्रदेशाध्यक्षांची निवड प्रथम आणि त्यानंतर मंडल अध्यक्ष निवड जाहीर होण्याचा काहीसा विचित्र प्रकार घडला. यामध्ये आवाडे गटाने बाजी मारत आपल्या कार्यकर्त्याची वर्णी लावली. त्यामुळे हाळवणकर गट दुखावल्याची चर्चा आहे.
त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडीही जाहीर झाल्या. विधानसभा निवडणूक लढवलेले विठ्ठल चोपडे आणि पक्षात नव्याने दाखल झालेले सुहास जांभळे यांच्या नावाची चर्चा जिल्हाध्यक्षपदासाठी होती. पक्षाने चोपडे यांना प्रदेश चिटणीस तर जांभळे यांच्या पदरात जिल्हाध्यक्षपद टाकले.
यामधील आणखी एक दावेदार बाळासाहेब देशमुख यांना सेवादलाचे उपाध्यक्षपद दिले. पण, निवडी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी चोपडे समर्थकांनी पक्ष कार्यालयात बैठक घेऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महाविकास आघाडीत सामसूम
महायुतीच्या घटक पक्षामध्ये एका बाजूला नवीन पदाधिकारी निवडीची धामधूम सुरु असताना शहरातील महाविकास आघाडीमध्ये मात्र सामसूम दिसून येत आहे. यामध्ये सहभागी असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निवडीबाबत कोणतीही हालचाल सध्या दिसून येत नाही. या पक्षामधून महायुतीमध्ये आउटगोईंग सुरु असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पण, तरीही यापैकी कोणत्याही पक्षाकडून नवीन पदाधिकारी निवडीबाबत चर्चा होताना दिसत नाही.
शहर कार्यालयाच्या पाटीवरच कापडी पट्टी लावली
जिल्हाध्यक्षपद नसेल तर चिटणीसपदाचे पत्र स्वीकारायचे नाही, जांभळे गटाला सहकार्य करायचे नाही, असा पवित्राच चोपडे समर्थकांनी घेतला. एवढेच नव्हे तर शहर कार्यालय या पाटीवरच कापडी पट्टी लावून ती बंद केली. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी शाप असलेली गटबाजीचा पुन्हा एकदा उफाळून आली.
महायुतीमधील हे दोन्ही पक्ष सबळ असून यांच्यामध्येच गटबाजी निर्माण उफाळल्याने या सर्व घटनांचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत दिसणार आहे. तो सकारात्मक की नकारात्मक यावर पक्षाने फिरवलेली भाकरी शेकणार, की करपणार हे दिसून येणार आहे.