इचलकरंजी मनपा कर्मचारी अपघातात जागीच ठार
हातकणंगलेनजीक दुर्घटना
भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक
कोल्हापूर
सांगली -कोल्हापूर मार्गावर हातकणंगले शहराच्या हद्दीत भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील इचरकरंजी महापालिकेचा कर्मचारी जागीच ठार झाला. आशितोष दिलीप कांबळे (वय ३५. रा. भारतनगर, हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे.
घटना स्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , मयत अशितोष कांबळे हे इचलकरंजीहून सांगली -कोल्हापुर मार्गावरील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभास दुचाकीवरून जात होते. मंगल कार्यालयानजीक आल्यानंतर चारचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की चारचाकी वाहनाने कांबळे यांच्यासह दुचाकी वाहनाला १०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले.
त्यामुळे कारचालक संदीप अर्जुन पाटील (रा .कोल्हापूर ) याच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत . हातकणंगले ग्रामीण रूग्णालयात शवविश्चेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .
कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरीस होते , कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती . त्यांचे अपघाती निधन झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे .