For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Inchalkaranji : इचलकरंजी महानगरपालिकेच्या भगतसिंग उद्यानातील अभ्यासिकेची दुरवस्था ; विद्यार्थ्यांची गैरसोय

12:38 PM Nov 24, 2025 IST | NEETA POTDAR
inchalkaranji   इचलकरंजी महानगरपालिकेच्या भगतसिंग उद्यानातील अभ्यासिकेची दुरवस्था    विद्यार्थ्यांची गैरसोय
Advertisement

               महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे भगतसिंग उद्यानातील अभ्यासिकेची दुर्दशा

Advertisement

इचलकरंजी : धुळींनी माखलेली बाकडे, गुटखा थुंकून लाल भडक केलेली खांबे, कचऱ्याचा ढीग आणि लगतच असलेल्या शौचालयाची प्रचंड दुर्गंधी.... ही अवस्था आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या भगतसिंग उद्यानातील लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या अभ्यासिकेची. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घरामध्ये अभ्यासाची सोय नसल्यामुळे ज्या जागेचा आधार होता त्या जागेचीच ही दुर्दशा झाली आहे. ज्या अभ्यासिकेत बसून अनेक जण प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत, अनेक परीक्षांमध्ये यश मिळवले आहे अशा अभ्यासकीची गेल्या काही वर्षातील ही दुर्दशा मात्र सर्वच घटकातील दुर्लक्षित राहिली आहे.

इचलकरंजी शहर हे कष्टकऱ्यांचे शहर म्हणून समजले जाते सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आजही अभ्यासिकेची या शहरात वाणवा आहे इचलकरंजी नगरपालिकेच्या टागोर वाचनालयाची अभ्यासिका वगळता शहरात सार्वजनिक अभ्यास केंद्र ची अन्य ठिकाणी व्यवस्थाच नाही. टागोर वाचनालयाचे इमारतीचे काम सध्या सुरू असल्यामुळे हे वाचनालय तात्पुरते मंगलधाम या ठिकाणी हलवण्यात आले आहे या ठिकाणीही संख्येला मर्यादा आहे.

Advertisement

गेल्या काही वर्षात शहरातील अनेक विद्यार्थी ठीक ठिकाणी असणारे उद्याने आणि नाट्यगृहाच्या परिसरात अभ्यासासाठी बसत असत. परंतु अनेक वेळा या ठिकाणी बागेत येणाऱ्या नागरिकांच्या मुळे विद्यार्थ्यांना अडचणीच निर्माण होत होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बसण्याची चांगली सोय व्हावी या उद्देशाने भगतसिंग विद्यालयात ओपन स्टडी रूम तयार करण्यात आले होते.

नगरपालिकेमार्फत या स्टडी रूमची चांगली देखभाल होत होती. विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्यामुळे नव्याने अभ्यासिका उभारण्यात आली. भौतिक सुविधेवर लाखो रुपये खर्च करताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीचे बसण्याची सोय असावी हे फारसे पाहिलेच नाही. दगडी फरशांचा वापर करून टेबल आणि बाकडे बनवण्यात आले.परंतु या अभ्यासिकेची सध्या प्रचंड दुर्दशा आहे. प्रचंड धुळीने माखलेली बाकडे आणि इमारतीमध्ये अस्वच्छता आहे. अनेक बाकड्यांची मोडतोड तर झालीच आहे

परंतु यापेक्षा गंभीर बाब म्हणजे अभ्यासिकेमध्ये बसून काही बाहेरील नागरिक गुटखा थुंकून लाल भडक केलेली जागा येणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत क्लेशदायक ठरते. लगतच शौचालय बांधण्यात आले आहेत. या शौचालयामध्ये लाईटची व्यवस्था नाही ना पाण्याची व्यवस्था. अनेकांनी या शौचाचा वापर करून तसेच सोडल्यामुळे प्रचंड विष्टा साठला आहे. याची दुर्गंधी तर या ठिकाणी पसरलीच आहे त्याचबरोबर शौचालयाच्या दुरवस्थेमुळे बहुतांश नागरिक अभ्यासिकेलालगत असलेल्या जागेचा वापर शौचासाठी करतात. याच ठिकाणी उद्यानातील कचराही आणून टाकण्यात आला आहे. या अवस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी मात्र लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेकडे पाठच फिरवली आहे.

कोणीच दखल घेत नाही...
शहरातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली एक प्रेरणादायी जागेची दुर्दशा महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पहावयास मिळते. दुर्दैवाने याबाबत कोणीच आवाज उठवत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

Advertisement
Tags :

.