एकाच खुर्चीसाठी दोन आयुक्तांमध्ये सत्तानाट्य... इचलकरंजी महापालिकेत रंगला हाय होल्टेज ड्रामा
येथील आयुक्त पदावर एकाच वेळी दोन अधिकारी येऊन बसल्यामुळे महापालिकेत प्रचंड गोंधळ उडाला. आयुक्त पदाच्या खुर्चीचा सत्तानाट्य तब्बल एक तास सुरू होता. अखेर मंत्रालयातून आदेश आल्यानंतर ओमप्रकाश दिवटे यांनी अधिकृतपणे आयुक्त पदावर खुर्चीवर विराजमान झाले. तर शासनाच्या आदेशाप्रमाणे दोन दिवसापूर्वी रुजू झालेल्या सातारा येथील जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील मात्र दालनातून बाहेर पडल्या.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=0JkTOBfwua4[/embedyt]
येथील महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सुमारे एक वर्षांपूर्वी ओम प्रकाश दिवटे यांची नियुक्ती झाली होती. दोन दिवसांपूर्वी शासनाने त्यांची बदली करत त्या ठिकाणी पल्लवी पाटील यांची नियुक्ती केली होती. पाटील यांच्या नियुक्तीच्या आदेशामध्ये त्यांना तात्काळ कार्यभार स्वीकारावा असे नगर विकास मंत्रालयाने म्हटले होते. त्याप्रमाणे पल्लवी पाटील यांनी बुधवारी सायंकाळीच पदभार स्वीकारला होता. याबाबत आयुक्त दिवटे यानी मॅट मध्ये दाद मागितली होती. यावेळी मॅटने आयुक्त दिवटे यांची शासनाने केलेल्या बदलीला स्थगिती दिली.
आज सकाळी आयुक्त दिवटे हे कार्यालयात हजर होण्यास आले असता ते येण्यापूर्वीच पल्लवी पाटील या आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसल्या होत्या. यावेळी कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तातडीने एका कर्मचाऱ्यांने आयुक्त दिवटे यांना दुसरी खुर्ची दिली. त्यानंतर आयुक्त पदाच्या खुर्चीवर एकाच वेळी दोघेही विराजमान झाले होते. आयुक्त दिवटे यांनी आपल्याला याच ठिकाणी रुजू होण्याचा आदेश असल्याचे सांगितले. परंतु पल्लवी पाटील आणि याबाबतचा आपल्याला तसा कोणताही लेखी आदेश नसल्याचे सांगितले. या कालावधीत मंत्रालयातून काही अधिकाऱ्यांचेही कॉल आले परंतु पल्लवी पाटील या खुर्चीवरच बसून राहिल्या.
मंत्रालयातील नगर विकास खात्याच्या कक्ष अधिकारी सुप्रिया बनकर यांनी मेल पाठवला. यामध्ये इचलकरंजी महानगरपालिका बदली बाबत शासनाच्या विरोधात निकाल दिला असून यामध्ये 12 जून रोजी शासनाने काढलेल्या आदेशास स्थगिती दिलेली आहे. सदर आदेश न्यायधीकारांनी श्रीमती पाटील व ओमप्रकाश दिवटे यांना तोंडी सूचना देण्याबाबत प्रधान सचिव नगरविकास यांना निर्देश दिले आहेत. तरी न्यायाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्यामध्ये नमूद केले होते. या प्रकारानंतर आयुक्त दिवटे यांनी रीतसर आयुक्त पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले.
एकाच पदावर दोन आयुक्त येऊन बसल्यामुळे अन्य अधिकाऱ्यांच्या ती मोठा संभ्रम उडाला होता याच कालावधीत मंत्रालयाला फॅक्स पाठवणे व अधिकाऱ्यांना दोघाकडूनही मोबाईल वरून संपर्क सुरू होता. परंतु अखेर श्री दिवटे यांनाच या पदावर कायम राहण्यास आदेश असल्याचे पाहून पल्लवी पाटील या आयुक्त कक्षातून बाहेर पडल्या.