Municipal election 2025 : मविआ एकाच चिन्हावर निवडणूक लढणार? इचलकरंजीत BJP ला चॅलेंज?
आगामी काळात राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता
इचलकरंजी : येथील महापालिका निवडणुकीसाठी मविआकडून पर्यायी आघाडीची चाचपणी सुरु असून पहिल्या टप्प्यात सर्व घटकपक्षांच्या उमेदवारांनी एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली. यामुळे आगामी काळात इचलकरंजीतील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता असून सत्ताधारी भाजपासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूक आगामी काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार १५ रोजी काँग्रेस कमिटीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षांची बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मैचेस्टर आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यासह सर्वच घटकपक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी पर्यायी आघाडी उभारण्यावर चर्चा झाली. यावेळी सर्वच घटकपक्षाच्या उमेदवारांनी एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्यावर चर्चा होवून जवळपास याच विषयावर एकमत झाले. मतदारसंघाचे आमदार व खासदार शहरातील अनेक प्रश्नाबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही.
सुळकूड पाणीयोजना, कृष्णा जलवाहिनी बदलाचे अपूर्ण काम यासह अन्य कामाबाबत दोघेही लोकप्रतिनिधी दिलेल्या आश्वासनाला बगल देण्याचे काम करत आहेत. महापालिकेचा कारभारातही या लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप होत असून मक्तेदारांच्या चुकीच्या कामांना संरक्षण देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून याचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकीत दिसणार आहेत, असे काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावचकर म्हणाले.
या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीकडून पर्यायी आघाडी मार्फत निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर आर्श्वय वाटण्याचे कारण नाही अशी चर्चाही या बैठकीत झाली. या पर्यायी आघाडीमध्ये केवळ महाविकास आघाडीच नव्हे तर अन्य पश्नातील उमेदवारांना स्थान देण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.
या दृष्टीकोणातून शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये सर्व्हे झाला असून वाताबरण सकारात्मक असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, मदन कारंडे, संजय कांबळे, राहूल खंजिरे, रणजीत जाधव, प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, नितीन कोकणे, सदा मलाबादे, भरमा कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपातील आजी-माजी यांच्यातील वाद पथ्यावर
भाजपामध्ये आवाडे व हाळवणकर यांचा बाद अजूनही शमलेला नाही. यामुळे त्यांच्यामधील कांही कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे आवाडे यांच्या विरोधात अनेक जण पर्यायी आघाडीत आल्यास आश्चर्य वाटावयास नको असे मॅचेस्टर आघाडीचे सागर चाळके म्हणाले. तसेच आम्ही कोठेही असलो तरी पर्यायी आघाडीतूनच निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले.
मविआला गळती लागणार नाही
सध्या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्षाला गळतीचे ग्रहण लागले आहे. पण इचलकरंजीमध्ये मात्र कोणतीही गळती होणार नाही. सर्व पक्षातील पदाधिकारी एकत्रित असून सर्वजण एकदिलाने आगामी निवडणूक लढवणार असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले.