Ichalkaranji News : पुन्हा गायरानमध्ये अतिक्रमण केल्यास गय नाही, सरपंचांचा अतिक्रमणधारकांना दम
गायरानमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर गय केली जाणार नाही
कबनूर : येथील कबनूर चंदूर रोडवरील आभारफाटा परिसरातील गायरानात सुमारे आठ भंगार व्यवसाय करणारे पत्र्याचे शेड मारून अतिक्रमण केले होते. स्वतःहून अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा जेसीबीद्वारे काढून टाकण्यात येईल अशा सक्त सूचना दिल्यानंतर अतिक्रमणधारकांनी स्वतःहून घातलेले पत्र्याचे शेड काढून घेण्यास सुरुवात केली. यापुढे गायरानमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर गय केली जाणार नाही, असे सरपंच सुधीर लिगाडे यांनी स्पष्ट केले आहे.
आठ ते दहा दिवसांपूर्वी कबनूरातील आभार फाटा परिसरात गायरान जागेत भंगार विकणारी आठ कुटुंब लहान कापडी तंबू बांधून राहिले होती. काही दिवसांनी त्यांनी तेथेच पत्र्याचे शेड बांधून त्यांनी व्यवसाय सुरू केला. याची माहिती ग्रामपंचायतला मिळताच त्वरित संबंधितांना अतिक्रमणित पत्र्याचे शेड काढून घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. ग्रामपंचायतकडून सूचना देऊनही पत्र्याचे शेड काढून घेण्यात आले नाही.
दरम्यान, आज उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी स्वतः गायरान जागेत जाऊन पाहणी करून संबंधितांना स्वतःहून काढून घ्या, अन्यथा ग्रामपंचायतीने काढून घेतल्यास आम्ही जबाबदार नाही अशा सक्त सूचना दिल्या. त्यानंतर भंगारवाल्यांनी अतिक्रमण करून स्वतःहून घातलेले पत्र्याचे शेड काढून घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत कर्मचारी होते.
काही वर्षांपूर्वी येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. त्यादरम्यान माजी सरपंच विजया पाटील यांनी स्वतः सहभागी होऊन पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवले होते. त्यावेळी सुद्धा अतिक्रमण जमीनदोस्त केले होते. दरम्यान आज उपसरपंच लिगाडे यांनी धाडसाचे पाऊल टाकत अतिक्रमण काढून घेण्यास भाग पाडले.
उपसरपंच सुधीर पाटील यांनी गावातील रस्त्याच्या दुतर्फी असलेली अतिक्रमणे स्वतःहून पुढाकार घेऊन काढून घेण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे आज त्यांनी गायरान जागेतील अतिक्रमण काढण्यास सक्त सूचना दिल्या. यापुढे गायरानमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.