Ichalkaranji Crime"व्याज देता येत नाही मग वेश्या व्यवसाय पत्कर" महिलेच्या शोषणाप्रकरणी इचलकरंजीच्या खासगी सावकाराला अटक
इचलकरंजी : व्याजाच्या जाळ्यातून विवाहितेला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून तिचे आर्थिक शोषण केल्याप्रकरणातील मुख्य संशयित सर्जेराव कुंभार याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कर्नाटकातून अटक केल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ही कोठडी मंजूर केली.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान संशयित कुंभार याने पीडित महिलेला व्याजाच्या जाळ्यात अडकवून आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील सुमारे दीड लाख रुपयांच्या व्यवहारांची सखोल चौकशी पोलीस कोठडीदरम्यान करण्यात येणार आहे. या रकमेची देवाणघेवाण, वसुलीची पद्धत आणि त्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील पोलिसांकडून पडताळला जात आहे.
दरम्यान, संशयिताने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर महिलांना व्याजाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे आर्थिक शोषण केले आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी त्याचे आर्थिक व्यवहार, संपर्कातील व्यक्ती तसेच संबंधित ठिकाणांची माहिती तपासली जाणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी आधीच इतर तीन संशयितांना अटक केली असून मुख्य सूत्रधार कुंभारच्या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.