आयसीसीचे ‘वेट अँड वॉच’
कारवाई तर होणारच, आयसीसीकडून स्पष्टीकरण : टीम इंडिया नियोजित वेळापत्रकानुसार श्रीलंकेला जाणार :
वृत्तसंस्था/ दुबई, कराची
आयसीसी टी-20 वर्ल्ड कप सुरु होण्यास अवघ्या सहा दिवस आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवा वाद निर्माण केला आहे. जवळपास आठवडाभर स्पर्धेत सहभागाबाबत निर्णय लांबवणाऱ्या पीसीबीने अखेर भारताविरुद्धचा सामना बहिष्कृत करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. पाकिस्तान सरकारच्या आदेशाचा हवाला देत पीसीबीने स्पष्ट केले की, पाक संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर पाणी फेरले असून, आयसीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त करताना पीसीबीला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा दिला आहे. दरम्यान, सध्या तरी आयसीसी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून पुढील 48 तासांत पाकिस्तानबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रविवारी पीसीबीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची घोषणा करताना भारताविरुद्ध सामना बहिष्कृत करण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही दिवसापासून या निर्णयाबाबत चर्चा सुरु होती, मात्र अधिकृत घोषणेनंतरच आयसीसीने यावर प्रतिक्रिया दिली. आययीसीच्या जाहीर केलेल्या निवेदनात, पीसीबीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अशा प्रकारच्या निवडक सहभागामुळे खेळाच्या अखंडतेला धक्का बसतो, यामुळे पीसीबीने पुन्हा एकदा विचार करावा, असे आयसीसीने त्यांना सूचवले आहे. याशिवाय, पीसीबीने आपल्या निर्णयाचे देशांतर्गत क्रिकेटवर होणारे दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम लक्षात घ्यायला हवेत. या निर्णयामुळे जागतिक क्रिकेट इकोसिस्टीमवर परिणाम होऊ शकतो, ज्याचा पीसीबी स्वत: एक सदस्य आणि लाभार्थी आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेचे यशस्वी आयोजन हे आयसीसीचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी सहभागी सर्व सदस्यांचीही त्यात तितकीच जबाबदारी आहे, असे आयसीसीने निवेदनात ठणकावून सांगितले आहे.
भारतीय संघ श्रीलंकेला जाणार
पाकचा संघ भारताविरुद्ध खेळायला तयार नसला, तरी भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या नियमांचे पालन करत श्रीलंकेचा प्रवास करणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार कोलंबोला जाईल. संघ तिथे सराव करेल, पत्रकार परिषदेला उपस्थित राहील आणि सामन्याच्या दिवशी वेळेवर स्टेडियममध्ये पोहोचेल. त्यानंतर पाकिस्तानचा संघ न आल्यास भारताला ‘वॉकओव्हर’ दिले जाईल. विशेष म्हणजे, आयसीसीच्या नियमानुसार, जर एक संघ नाणेफेकीसाठी मैदानात उपस्थित राहिला आणि दुसरा संघ आला नाही, तर सामनाधिकारी उपस्थित असलेल्या संघाला ‘वॉकओव्हर’ दिल्याचे घोषित करतात. म्हणजेच भारतीय संघाला सामना न खेळताच 2 गुण मिळतील.
वर्ल्डकपमध्ये सहभागी न झाल्यास आयसीसी उगारणार कारवाईचा बडगा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा हा निर्णय आयसीसी-बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात झालेल्या बंधनकारक कराराचे उल्लंघन आहे. यामुळे पीसीबीवर कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. पीसीबीविरुद्ध धक्कादायक निर्णय घेतले जाऊ शकतात.
- पाकिस्तानला टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर काढले जाऊ शकते.
- आयसीसीकडून पीसीबीला मिळणारा कोट्यावधी रुपयांचा महसूल रोखला जाऊ शकतो.
- बहुचर्चित भारत-पाक सामना रद्द झाल्यास ती भरपाई पीसीबीकडून वसूल केली जाऊ शकते.
- आयसीसी क्रमवारी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बसणार गुण कपातीचा मोठा फटका
- पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यास विदेशी खेळाडूंवर बंदी
- द्विपक्षीय मालिकांसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यासाठी मोठे संघ नकार देऊ शकतात.
पाकिस्तानी खेळाडूंनी अनेकदा निवृत्ती जाहीर केली आहे आणि नंतर त्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे. आताचा प्रकारही तसाच असेल. मला वाटते की पुढील चार-पाच दिवसांत जेव्हा जगभरातून आणि त्यांच्या माजी खेळाडूंकडून प्रतिक्रिया येतील, तेव्हा पाकिस्तान आपली भूमिका बदलू शकेल.
सुनील गावसकर, माजी खेळाडू.