आयसीसीची महिलांसाठी नवी क्रिकेट स्पर्धा
वृत्तसंस्था / बँकॉक
भारतात नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला संपूर्ण जगातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने आयसीसीने आता महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर अधिक प्रोत्साहन मिळावे या हेतुने पहिल्यांदा महिलांसाठी 8 संघांचा सहभाग असलेली नवी स्पर्धा घेण्याची घोषणा केली आहे. सदर स्पर्धा बँकॉकमध्ये 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
या स्पर्धेमध्ये 8 संघांचा समावेश राहील. आयसीसीतर्फे शनिवारी येथे या स्पर्धेतील विजेत्याला देण्यात येणाऱ्या इमर्जिंग नेशन चषकाचे अनावरण मोठ्या थाटात करण्यात आले. ही स्पर्धा म्हणजे महिला क्रिकेट विस्तारीकरण प्रक्रियेचा एक भाग आहे. सदर स्पर्धेमध्ये थायलंड, नेदरलँड्स, पापुआ न्यू गिनीया, संयुक्त अरब अमिरात (युएई), स्कॉटलंड, नामीबिया, तांझानिया आणि युगांडा यांचा समावेश आहे.
भारतामध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला विविध सामन्यांसाठी सुमारे 3 लाख क्रिकेट शौकिनांनी आपली उपस्थिती दर्शविली. महिला क्रिकेटचे भवितव्य उज्वल असल्याने आयसीसीने या विस्तारीकरण कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर माहिती आयसीसीचे प्रमुख कार्यकारी संजोग गुप्ता यांनी दिली आहे. महिला क्रिकेट क्षेत्रामध्ये नवोदित संघांना संधी मिळावी यासाठी आयसीसीचे प्रयत्न सुरू आहेत. 20 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेला प्रारंभ होत असून यजमान थायलंड आणि नेदरलँड्स यांच्यात सलामीचा सामना तर त्यानंतर पापुआ न्यू गिनीया व संयुक्त अरब अमिरात यांच्यात दुसरा सामना खेळविला जाईल.