महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयसीसी टी-20 विश्वचषक धमाका

12:50 PM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रिकेटची अमेरिकेवर स्वारी!

Advertisement

‘आयपीएल’ नुकतंच संपलंय अन् आता वेध लागलेत ते ‘टी-20 विश्व़चषक स्पर्धे’चे...यावेळचं वैशिष्ट्या म्हणजे प्रथमच ही स्पर्धा वेस्ट इंडिजबरोबर अमेरिकेत रंगणार. यामागं क्रिकेटच्या प्रसाराचा हेतू तर आहेच, त्याशिवाय त्यामागं लपलंय ते भन्नाट अर्थकारण... तिहासाची पुनरावृत्ती घडतेय...19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेत क्रिकेट हे विरंगुळ्याचं एक लोकप्रिय साधन म्हणून प्रचलित होतं हे सांगितल्यास आता कुणाचा विश्वास बसणार नाहीये...स्थलांतरितांनी ते विशेषत: न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फियामध्ये भरभराटीस आणलं. पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना अमेरिका नि कॅनडा यांच्यात बिग अॅपलमध्ये 1844 साली खेळला गेला आणि इंग्लंडमधून येणारे संघ वरचेवर दौरा करायचे...अमेरिकेत क्रिकेट खेळल्याचा पहिला ठोस पुरावा त्याच्याही आधी पार 1709 मध्ये सापडतो. ‘यूएसए क्रिकेट’ मंडळाच्या नोंदीनुसार, बेंजामिन फ्रँकलिन यांनी क्रिकेटच्या अधिकृत नियमांचं पुस्तक 1754 मध्ये इंग्लंडमधून परत आणलं...धक्का बसेल अशी बाब म्हणजे 18 व्या शतकाच्या मध्यापर्यंत हा खेळ तेथील 22 राज्यांत सुमारे एक हजार क्लबांद्वारे खेळला जात होता. मात्र नागरी युद्धादरम्यान व नंतर त्याला ग्रहण लागलं अन् मजबूत पकड जमविली ती बेसबॉलनं...पण आता क्रिकेट पुन्हा अमेरिकेत पाय रोवण्यास सिद्ध झालंय ते त्याच्या सर्वांत लहान ‘टी-20’ स्वरुपातून...

Advertisement

क्रिकेटमधली सर्वोच्च मानली जाणारी विश्वचषक स्पर्धा प्रथमच अमेरिकेत रंगताना दिसेल...त्या देशात क्रिकेटला बहुतेक करून पसंत केलं जातं ते इतर देशांतून, खास करून भारतातून तिथं थडकलेले स्थलांतरित आणि त्यांच्या मुलांकडून (‘आयसीसी’नुसार अमेरिकेत आहेत 3 कोटी क्रिकेट रसिक)...या खेळाला तिथं खरी चालना मिळाली ती गेल्या वर्षी ‘मेजर लीग क्रिकेट’च्या माध्यमातून. या लीगनं अमेरिकेत लॉस एंजलिस नाइट रायडर्स, एमआय न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स, सिएटल ऑर्कास, टेक्सास सुपर किंग्ज नि वॉशिंग्टन फ्रीडम या सहा संघांसह पाऊल ठेवलं...

डलासचं ग्रँड प्रेरी मैदान हे मूळचं बेसबॉलचं. त्याच रुपांतरित स्टेडियमवर  काही महिन्यांपूर्वी रंगलेला ‘आयपीएल’चा हा अमेरिकी अवतार काही प्रमाणात तरी अमेरिकींना क्रिकेटकडे आकर्षित केल्याशिवाय राहिलेला नाही. खास करून भांडवलदार अमेरिकन्सना त्यात नफा दिसू लागलाय. त्यामुळे अमेरिकी नागरिकांकडून क्रिकेटमध्ये वाढत्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही...

‘मायक्रोसॉफट’चे सत्या नडेला आणि ‘अॅडोब’चे शंतनू नारायण यासारख्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज नावांचा पाठिंबा लाभलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात स्टेडियम सरासरी 80 टक्के भरले अन् तिकीट विक्रीतून गोळा झाले 2.8 दशलक्ष डॉलर्स...बेसबॉलवेड्या राष्ट्रामध्ये निकोलस पूरन, ट्रेंट बोल्ट, रशिद खान आणि फाफ डू प्लेसिस यासारख्या ‘टी-20’ स्टार्सचा खेळ पाहण्यासाठी सुमारे 70 हजार प्रेक्षकांनी लोटणं हे नवलच नव्हे काय ?...

अमेरिकी नागरिकांना क्रिकेटकडे वळण्यास आणखी एक बाब प्रोत्साहन देऊन जाईल ती म्हणजे यंदा विश्वचषकात उतरणार असलेला त्यांचा ‘टी-20’ संघ. स्पर्धा उंबरठ्यावर पोहोचलेली असताना यजमानांनी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत ऐतिहासिक विजय मिळविल्यानं त्यांचा हुरुप निश्चितच वाढलेला असेल. शिवाय वातावरणनिर्मितीला हातभार लागेल तो वेगळा...

अमेरिकेत क्रिकेट क्लबांची चांगली उपस्थिती असली, तरी ते बहुतेक करून ह्युस्टन, बोस्टन, न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, फिनिक्स यासारख्या शहरी भागांमध्ये केंद्रीत आहेत. फ्लोरिडात देखील काही क्लब सापडतात ते कॅरिबियन बेटं जवळ असल्यामुळं...स्थानिक क्लब वाढत असले, तरी त्यांना अडचण भेडसावते ती पायाभूत सुविधांच्या अभावाची. त्यांना सामने रग्बी किंवा बेसबॉलसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुउद्देशीय स्टेडियममध्ये आयोजित करावे लागतात. अनेक प्रसंगी, क्रिकेटपटूंना बेसबॉल खेळाडूंसोबत मैदान वापरावं लागतं...

तज्ञांच्या मते, क्रिकेट नि अमेरिका यांच्यासाठी ही एक ऐतिहासिक संधी...विश्वचषकाच्या निमित्तानं अनेक दिग्गज क्रिकेटपटू अमेरिकी भूमीत खेळताना दिसणार असले, तरी सर्वांत जास्त उत्कंठा राहील ती ‘हाय-प्रोफाइल’ भारत-पाकिस्तान सामन्याविषयी...त्याशिवाय अमेरिका-भारत लढत देखील काही कमी कुतूहल जागवून गेलेली नाहीय. न्यूयॉर्कमधील ज्या ठिकाणी हा सामना होईल त्याची क्षमता 34 हजार आसनांची असून सर्व तिकिटं आधीच विकली गेलीत. यावरून अमेरिकेत क्रिकेटला वाढण्यासाठी किती वाव आहे ते कळून चुकतं...

‘यूएसए क्रिकेट’च्या मते, विश्वचषकाचा काही भाग आणि विशेषत: भारत-पाकिस्तान सामना अमेरिकेत आयोजित करण्याच्या ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळा’चा (आयसीसी) निर्णय ही एक धोरणात्मक चाल. त्या देशात क्रिकेटच्या वाढीच्या दृष्टीनं जी क्षमता आहे त्याचा फायदा घेण्याचा हेतू यामागं दडलाय...क्रिकेट काही वर्षांनी पुन्हा अमेरिकेच्या भूमीत थडकेल ते 2028 च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमधून...काही का असेना ‘टी-20’ विश्वचषकाच्या निमित्तानं अमेरिकेत क्रिकेटविषयी चर्चा सुरू झालीय, अमेरिकन लोक क्रिकेट व बेसबॉलमधील फरक तरी समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलेत हेही नसे थोडके...

डोकं चक्रावून टाकणारं अर्थकारण...

अर्थात यामागं निव्वळ क्रिकेटच्या प्रसाराचा हेतू नव्हे, तर भन्नाट अर्थकारण अन् त्यादृष्टीनं नवनवीन बाजारपेठा धुंडाळण्याचा हेतू देखील लपलाय यात शंका नाही...अन् भांडवलशाहीचं, आर्थिक उदारीकरणाचं प्रमुख केंद्र असलेल्या अमेरिकेहून चांगलं स्थान यासाठी दुसरं सापडणार ते कुठलं ?...आशियाई उपखंडात तर क्रिकेटच्या आर्थिक पैलूनं प्रचंड मोठं रूप धारण केलंय. त्याचा ‘कोहिनूर हिरा’ म्हणजे भारत...

एका ताज्या अहवालानुसार, 2008 मध्ये ‘आयपीएल बूम’ सुरू झाल्यापासून भारतीय क्रीडा उद्योगानं 6.5 पट वाढ नोंदविलीय. प्रायोजकत्व आणि जाहिरातींच्या माध्यमातून त्याची कमाई 2008 मधील 2 हजार 423 कोटी रुपयांवरून 2023 मध्ये तब्बल 15 हजार 766 कोटी रुपयांवर पोहोचली. उद्योगानं 15 हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ...यात सर्वांत मोठा वाटा उचललाय तो अर्थातच क्रिकेटनं (एकूण खर्चाच्या 87 टक्के म्हणजे 13 हजार 701 कोटी रु.). 2022 च्या (12 हजार 115 कोटी रु.) तुलनेत त्यात गेल्या वर्षी दिसून आली 13 टक्के वाढ....‘क्रीडा प्रायोजकत्वा’वरील खर्चातही क्रिकेटचा स्वाभाविकपणे सिंहाचा वाटा राहिलेला असून 2023 मधील एकूण 7 हजार 345 कोटींच्या महसुलातील 79 टक्के हिस्सा वळला तो क्रिकेटच्या दिशेनं. 2022 शी तुलना करता ही वृद्धी 32 टक्क्यांची...

भारतातील सर्वांत लोकप्रिय खेळाच्या व्यावसायिकीकरणास मोठी चालना मिळालीय ती ‘आयपीएल’मुळं यात दुमत असू शकत नाही. त्या स्पर्धेचं ब्रँड मूल्य 2008 मध्ये सुरुवात झाल्यापासून चक्क 433 टक्क्यांनी वाढलंय...या पार्श्वभूमीवर ‘व्हायकॉम 18’ नि ‘डिस्ने’ यांच्यातील तीव्र बोली युद्धामुळं क्रिकेटवरील खर्चात वाढ होण्यास मोलाचा हातभार लागला. ‘व्हायकॉम’नं 2023 ते 2027 कालावधीसाठी ‘आयपीएल’च्या डिजिटल आणि टीव्ही प्रसारणाचे हक्क अनुक्रमे 23 हजार 758 कोटी रु. अन् 23 हजार 575 कोटी रुपयांना मिळविले (त्यानंतर मुकेश अंबानीनी ‘डिस्ने’च्या भारतीय कारभाराचं अधिग्रहण केलं). याउलट ‘स्टार’नं 2018 ते 2022 कालावधीसाठी टीव्ही नि डिजिटल असे दोन्ही हक्क मिळवले होते ते 16 हजार 347 कोटी रुपयांच्या बदल्यात...वेगवेगळ्या मीडिया हक्कांच्या विक्रीमुळं ‘आयपीएल’चं प्रति सामना मूल्य आता 118.5 कोटी रुपयांवर म्हणजे जगात ‘नॅशनल फुटबॉल लीग’नंतर (एनएफएल-141 कोटी रु.) दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलंय...

दर्शकांच्या बाबतीत तर नवनवीन उच्चांक नोंदविणं कायम असून 2023 मध्ये ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या प्रसारणाला भारतात विक्रमी 50.5 कोटी दर्शन लाभले. त्यासरशी अर्ध्या अब्जाहून अधिक प्रेक्षकांना खेचणारी ती पहिली स्पर्धा बनली...‘फोर्ब्स’च्या मते, ‘आयपीएल’मधील संघांच्या सरासरी मूल्यानं 1 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडलाय अन् त्याची मोहिनी गुंतवणूकदारांवर देखील पडू लागलीय. जून, 2021 मध्ये खासगी इक्विटी फर्म ‘रेडबर्ड’नं राजस्थान रॉयल्समध्ये 37.5 दशलक्ष डॉलर्स मोजून घेतलेला 15 टक्के हिस्सा हा त्याचाच परिपाक...

या पार्श्वभूमीवर टी-20 क्रिकेट विश्वचषकात अधिकृत मीडिया हक्कधारक ‘डिस्ने स्टार’ हे जाहिरातींच्या माध्यमातून सुमारे 1 हजार 600 ते 1 हजार 800 कोटी रु. कमावण्याची शक्यता व्यक्त केली जातेय...‘डिस्ने स्टार’नं 2023 ते 2027 या कालावधीतील सर्व ‘आयसीसी’ स्पर्धांचे प्रसारण हक्क मिळविले होते ते 3 अब्ज डॉलर्स मोजून. याशिवाय ‘आयसीसी’चे प्रायोजक-भागीदार, जागतिक भागीदार, अधिकृत भागीदार, कॅटेगरी पार्टनर्स यांचा विचार केल्यास क्रिकेटमधील सर्वोच्च संघटना लयलूट करेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. (2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात ‘आयसीसी’नं केवळ प्रायोजकत्वातून कमावले जवळपास 15 कोटी डॉलर्स)...दुसरी बाब तिकीट विक्रीची. अमेरिका व वेस्ट इंडिजमधील स्पर्धेस 15 ते 20 लाख चाहते उपस्थित राहतील अशी अपेक्षा. याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या तिजोरीत भर पडेल ती 10 कोटी वा त्याहून अधिक डॉलर्सची !

विविध स्पोर्ट्स लीगचं अर्थकारण...

वर्ल्डकप विजेत्यांवर होणार बक्षीसांचा पाऊस

यंदाचा टी 20 वर्ल्डकप हा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा 2 जूनपासून सुरु होणार असून 29 जून रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल. दरम्यान, आयसीसीने वर्ल्डकपमधील बक्षीसांची रक्कम जाहीर केली असून विजेत्यांवर बक्षीसांचा पाऊस पडणार आहे.

टी 20 विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम

भारतीय दुधाचा ब्रँड दिसणार विश्वचषकात

दोन जूनपासून टी 20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरु होणार आहे. तब्बल 20 संघाचा सहभाग असलेली ही पहिलीच वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. युरोपमधील स्कॉटलँड आणि आयर्लंडचे संघही आपलं नशीब अजमावणार आहेत. विशेष म्हणजे, कर्नाटकमधील सहकारी दुध संघ असलेले नंदिनी डेअरी ब्रँड विश्वचषकात दिसणार आहे. आयर्लंड आणि स्कॉटलँड संघाचे प्रायोजकत्व या कंपनीने स्वीकारले असल्याचे स्कॉटलँड क्रिकेट मंडळाने सांगितले आहे. आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेत या संघाच्या टी शर्टवर नंदिनी ब्रँड दिसणार आहे. स्कॉटलंड संघाचा कर्णधार रिची बेरिंग्टनचा नंदिनी ब्रँड लोगो असलेली जर्सी घातलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मलेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, अमेरिका, दुबई, यूएई इत्यादी देशांमध्ये ओळखली जाणारी कर्नाटकची शान असलेली नंदिनी आता स्कॉटलँड आणि आयर्लंडच्या संघांना प्रायोजित करत आहे. नंदिनीला जागतिक ब्रँड बनवण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे नंदिनी डेअरीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या लूकमध्ये

आदिदास कंपनीने आगामी टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची जर्सी लाँच केली आहे. वर्ल्डकपसाठी तयार करण्यात आलेल्या जर्सीमध्ये भगव्या व निळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय स्पॉन्सर असणाऱ्या ड्रीम 11 चे नाव जर्सीवर दिसत आहे. त्याच्या खाली इंडिया असे नाव मोठ्या अक्षरात लिहिण्यात आले आहे. नव्या जर्सीवर पांढरी पट्टी आहे आणि मध्ये निळा रंग आहे. तसेच हाताच्या बाजूला भगवा रंग आहे. निळ्या आणि भगव्या रंगाचं कॉम्बिनेशन जबरदस्त दिसत आहे. जर्सी लाँच होण्याआधीच त्याचा फोटो सोशल मीडियावर लीक झाला होता. आता आदिदासनेही जर्सी जारी केली आहे. प्रत्येक आयसीसी स्पर्धेपूर्वी संघांच्या नवीन जर्सी लाँच केल्या जातात. क्रिकेट चाहते भारताच्या अधिकृत टी 20 वर्ल्डकप जर्सीची आतुरतेने वाट पाहत होते. आदिदास किट प्रायोजक आहे आणि ते वनडे आणि टी 20 साठी वेगवेगळ्या जर्सी बनवतात.

आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक 2024

क्रिकेट म्हटलं की कुणाला लगेच यूएसए म्हणजे अमेरिकेचा संघ आठवतही नाही. पण त्याच अमेरिकेत आता टी 20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जात आहे.आयसीसीने जेव्हा 2024 मधील टी 20 वर्ल्डकपचे सहयजमानपद युएसए व वेस्ट इंडिजला बहाल केले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. अमेरिकेत ना क्रिकेटच्या कायमस्वरुपी सुविधा आहेत, ना तिथे भक्कम प्रथमश्रेणी क्रिकेट आहे.तिथे जेवढं क्रिकेट खेळलं जातं, तेही तुलनेने मर्यादित स्वरुपातच आहे. पण क्रिकेटला नव्या देशात, नव्या बाजारपेठेत नेणे या उद्देशाने आयसीसीने हा निर्णय घेतला असावा असे सांगितले जात आहे. अर्थात, अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने देखील जय्यत तयारी केली असून अमेरिकेतील सर्वच मोठ्या शहरात जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात केली आहे. अमेरिकेतले भारतीयच नाही तर दक्षिण आशियाई आणि कॅरेबियन वंशाचे लाखो लोक या स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.2 जून रोजी अमेरिका वि कॅनडा लढतीने स्पर्धेला प्रारंभ होणार असून 29 रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

-राजू प्रभू

पुन:श्च भरारीचे आव्हान

आयसीसी वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवाची एवढी चर्चा होत आहे, जेवढी भारतीय क्रिकेट संघाच्या कुठल्याही पराभवाची आजपर्यंत झाली नसेल. भारतीय संघाचा आत्मविश्वास उत्तम होता. सलग दहा सामने एकतर्फी जिंकण्याची किमया केली होती. स्पर्धेतून बाहेर फेकला जातो की काय, अशा परिस्थितीतून ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत आला होता. कांगारूंना फार काही गमवायचे नव्हते. यातच अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने तगडी कामगिरी केली. याउलट स्पर्धेत दमदार कामगिरी करुनही टीम इंडियाने मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. अर्थात, या गोष्टीला सहा महिन्यांचा कालावधी लोटून गेला आहे. पूलाखालून बरेच पाणी गेले आहे. नव्या वर्षात टीम इंडियाने झाले गेले विसरुन द.आफ्रिका दौरा केला, यामध्ये यश मिळवले. घरच्या मैदानावर साहेबांनाही पाणी पाजले. आता आयपीएलमध्येही भारतीय खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. आयपीएलनंतर आता 1 जूनपासून आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होत आहे. आयसीसीच्या 2013 पासून आजपर्यंत वनडे, टी 20 व कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये जेतेपद मिळवता आलेले नाही. गेल्या दशकातील अपयशी मालिका मागे टाकत टी 20 वर्ल्डकपमध्ये पुन:श्च भरारी घेण्याची भारतीय संघाला नामी संधी असणार आहे.

वेगवान खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी 20 क्रिकेटने तरुणाईला अक्षरश : वेड लावले आहे. जगभरात अनेक ठिकाणी टी 20 सामन्यांचे आयोजन केले जाते. यातच भारतातील इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) मागील दशकभरापासून आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. आयपीएल, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग यासारख्या नामांकित टी 20 लीगनी जगभरात धुमाकूळ घातला आहे. करोडो लोक या लीग स्टेडियमवर व ऑनलाईन पाहण्यासाठी आपला वेळ खर्चत असतात. यावरुन टी 20 लीगची लोकप्रियता खऱ्या अर्थाने दिसून येते.

अवघ्या साडे तीन तासांच्या या खेळात अक्षरश: धावांचा पाऊस पाडला जातो. चौकार-षटकारांची बरसात होते. प्रेक्षकांचे मनोरंजन होते, जाहिरात कंपन्यांना मोठा महसूल मिळतो. यामुळेच आयसीसी दर दोन वर्षांनी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करत असते. यातच यंदाचा टी 20 वर्ल्डकप अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये 1 जून ते 20 जून या कालावधीत होणार आहे. 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वात पहिलावाहिला वर्ल्डकप जिंकला, यानंतर मात्र टीम इंडियाला जेतेपदापासून लांबच रहावे लागले. आता, अमेरिका व विंडीजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहभागी होत आहे. यामुळे 17 वर्षानंतर पुन्हा भारतीय संघ वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

गतवर्षी भारतात झालेल्या वनडे विश्वचषकामध्ये टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करत फायनल गाठली होती. अहमदाबादच्या मैदानावर फायनल झाली, यात टीम इंडियाला हार पत्करावी लागली. जोरदार अभ्यास करुनही मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला अखेरच्या परीक्षेत मात्र नापास व्हावे लागले. घरच्या मैदानावर पराभव झाल्यानंतर रोहित शर्माचा पडलेला चेहरा साऱ्या जगाने पाहिला होता. खेळाडूंच्या चेहऱ्यावर सपशेल निराशा दिसत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये जात खेळाडूंना पाठबळ दिले होते. या साऱ्या गोष्टीला आता सात-आठ महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे. नव्या वर्षात टीम इंडियाने कात टाकत दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, इंग्लंडविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली आहे. आयपीएल गाजवल्यानंतर भारतीय खेळाडू आता वर्ल्डकप गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गेल्या दोन दशकांत भारतीय क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. भारतातलं खेळांचं विश्वच बदललं आहे. रोहित शर्माची टीम नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करते. मागील आठवड्यात बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जाहीर केला. विराट कोहली, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव हे अनुभवी खेळाडू संघात असणार आहेत. दुसरीकडे, कार अपघातानंतर ऋषभ पंतचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. याचबरोबर संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे हे युवा खेळाडू प्रथमच आयसीसीच्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. 2007 मध्ये नवोदितांच्या साथीत महेंद्रसिंह धोनीने वर्ल्ड कप उंचावला होता. त्यावेळी, संघात असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा यावेळीही संघात आहेत. 17 वर्षानंतर आता पुन्हा एकदा आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्याच्या अपेक्षांचे ओझे टीम इंडिया भरवशाच्या खेळाडूंच्या साथीत किती पेलणार याचे उत्तर जूनच्या अखेरीस मिळणार आहे.

नव्या नियमांची नांदी

अमेरिका व विंडीजमध्ये होणाऱ्या आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान दोन नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. क्रिकेटच्या सामन्यात सर्वात जास्त वेळ खर्च होतो तो, दोन षटकांमधील ब्रेकमध्ये. कारण दोन षटकांतील ब्रेकमध्ये बराच वेळ जातो आणि त्यामुळे सामना नियोजित वेळेत संपू शकत नाही. पण आता तसे होणार नाही. कारण आता स्टॉप क्लॉक हा नवीन नियम टी 20 वर्ल्ड कपमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये लागू होणाऱ्या अशाच काही नियमांचा घेतलेला आढावा...

24 तासांत अंतिम फेरी

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी पाऊस पडला आणि सामना लांबला, तर अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघाला विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी विश्रांतीसाठी फारसा वेळ मिळणार नाही. त्याला 24 तासांत अंतिम सामना खेळायचा आहे. याशिवाय अंतिम फेरीसाठी संघाला प्रॉव्हिडन्स ते ब्रिजटाऊन असा प्रवास करावा लागणार आहे. अशा स्थितीत आयसीसीने दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी योग्य नियोजन केले नसल्याचे दिसते. या स्पर्धेचा अंतिम सामना बार्बाडोस येथे 29 जून रोजी होणार आहे.

टी-20 वर्ल्डकपमधील सर्वकालीन विक्रम

आयसीसी पुरुषांच्या टी 20 वर्ल्डकपला तीन दिवसांचा कालावधी राहिला आहे. यंदा प्रथमच अमेरिका खंडात क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन केले जात असल्याने याबाबत मोठी उत्सुकता आहे. 1 ते 29 जूनदरम्यान टी 20 वर्ल्ड कपचे आयोजन होणार असून अमेरिकेसोबत वेस्ट इंडीजमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेची ही नववी आवृत्ती आहे आणि यावेळी तब्बल 20 संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील 20 संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली असून एका गटात पाच संघ आहेत. प्रत्येक गटातून दोन अशा आठ संघांना सुपर एट फेरीत प्रवेश मिळेल. यातील चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. अमेरिका व विंडीजमध्ये चालणारा हा महाकुंभमेळा तब्बल महिनाभर चालणार आहे. विशेष म्हणजे, दर दोन वर्षांनी होणाऱ्या या टी 20 वर्ल्डकपमध्ये सातत्याने नवे विक्रम होत असतात. अशाच टी 20 वर्ल्डकपमधील विक्रमांचा घेतलेला आढावा...

वर्ल्डकप स्पर्धेतील सहभागी संघ

आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धा यंदा अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये 1 जून ते 29 जून या कालावधीत खेळवली जाणार आहे. यंदाच्या या स्पर्धेत तब्बल 20 संघ सहभागी होत आहेत. 29 एप्रिल रोजी न्यूझीलंडने वर्ल्डकपसाठी आपला संघ जाहीर केला. पाठोपाठ इतर संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. याच संघाचा घेतलेला थोडक्यात आढावा...

ऑस्ट्रेलिया

अफगाणिस्तान

बांगलादेश

आयर्लंड

इंग्लंड

कॅनडा

नामिबिया

नेपाळ

नेदरलँड्स

न्यूझीलंड

ओमान

पापुआ न्यू गिनी

स्कॉटलंड

पाकिस्तान

श्रीलंका

युगांडा

अमेरिका

वेस्ट इंडीज

दक्षिण आफ्रिका

वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची तगडी फौज

अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपलेल्या आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 शिलेदार सहभागी होणार आहेत. यामध्ये मुख्य संघातील 15 आणि तीन राखीव खेळाडूंचा समावेश आहे. तसेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जच्या शिवम दुबेचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. तर गुणवत्ता आणि कामगिरी या दोन्ही आघाड्यांवर सरस ठरुनही आतापर्यंत फारशी संधी न मिळालेल्या संजू सॅमसनलाही भारतीय संघाचे दरवाजे अखेर उघडे झाले आहेत. याशिवाय, एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान न मिळालेला फिरकीपटू युजवेंद्र चहललाही बऱ्याच काळानंतर टीम इंडियात स्थान मिळाले आहे.

नासाऊ कौंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क

आयसीसी टी 20 वर्ल्डकपचे सामने वेस्ट इंडीजच्या वेगवेगळ्या देशांमधल्या सहा स्टेडियम्सवर आणि अमेरिकेतल्या तीन स्टेडियम्सवर खेळवले जातील. भारताचे साखळी फेरीतले सगळे सामने अमेरिकेतच होणार आहेत. यातील तीन सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ कौंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील. नासाऊ कौंटी स्टेडियम न्यूयॉर्क राज्यातल्या लाँग आयलंडवर ईस्ट मीडोज याठिकाणी आहे. हे एक तात्पुरत स्टेडियम असून स्पर्धेसाठी त्याची खास उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या स्टेडियमचे पिच खास ऑस्ट्रेलियात तयार करुन आणण्यात आले आहे. ही खेळपट्टी एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेता येते. सामना सुरु होण्याआधी फक्त 24 तास ही खेळपट्टी स्टेडियममध्ये बसवली जाऊ शकते. सामना संपल्यानंतर ही खेळपट्टी लगेच काढताही येते. या स्टेडियमची क्षमता 34 हजार इतकी आहे.

विनायक भोसले

Advertisement
Tags :
#icc t20 world cup 2024#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article