आयसीसी वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर
दक्षिण आफ्रिकेत रंगणार 2027 चा वर्ल्डकप : 14 संघ 57 सामने खेळणार,भारत-पाक एकाच गटात
वृत्तसंस्था/दुबई
आयसीसी पुरुष वनडे विश्वचषक 2027 स्पर्धेच्या वेळापत्रकाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांच्या 12 शहरांमध्ये पार पडणार आहे. 2 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या काळात ही विश्वचषक स्पर्धा पार पडेल. विश्वचषक स्पर्धेत भारताला ग्रुप ए मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. केपटाउन येथे झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली
2 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या सुपर सीरिजला सुरुवात होईल. तर भारतीय संघाचा पहिला सामना 7 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केप टाउनमध्ये खेळवण्यात येईल. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 10 ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असणार आहे. दरम्यान, वनडे वर्ल्डकपमध्ये दोन गट असणार आहेत. या दोन्ही गटात एकूण सहा संघ असतील. त्यापैकी प्रत्येक गटातील 5-5 संघ जाहीर करण्यात आले आहेत. विश्वचषकात प्रथमच 14 संघ सहभागी होतील आणि 57 सामने खेळवले जातील. क्वालिफायर स्पर्धा झाल्यानंतर उर्वरित दोन संघ जाहीर होतील.
12 ठिकाणी सामने होणार
आयसीसीने विश्वचषकासाठी 12 ठिकाणे निश्चित केली आहेत. यापैकी 8 दक्षिण आफ्रिकेत, 3 झिम्बाब्वेमध्ये आणि 1 नामिबियात आहे. नामिबिया प्रथमच पुरुषांच्या विश्वचषकातील सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यापूर्वी 2003 मध्येही विश्वचषकाचे यजमान राहिले आहेत. 2027 मधील आयोजनामुळे 24 वर्षांनंतर पुरुषांच्या वनडे विश्वचषकाचे आफ्रिकेत पुनरागमन होणार आहे.
वर्ल्डकप स्पर्धेची गटवारी
अ गट : भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि क्वालिफायएर ए.
गट ब : बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि क्वालिफायर बी.