‘आयसीसी’ला द्विस्तरीय कसोटी क्रिकेट व्यवस्थेचे वेध
भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडसारख्या बड्या राष्ट्रांदरम्यान अधिक मालिका खेळविण्याच्या दृष्टीने चाचपणी
वृत्तसंस्था/ सिडनी-नवी दिल्ली
आयसीसी सध्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाच्या सहकार्याने या मोठ्या तीन राष्ट्रांमध्ये अधिक मालिका खेळविल्या जाण्याच्या दृष्टीने द्विस्तरीय कसोटी प्रणाली अंमलात आणण्याची शक्यता तपासून पाहत आहे. ‘दि एज’ने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह या महिन्याच्या अखेरीस क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माइक बेयर्ड आणि इंग्लंड क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांची भेट घेऊन यासंदर्भातील मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
कसोटी क्रिकेट द्विस्तरावर नेण्याची कोणतीही योजना 2027 मध्ये म्हणजे सध्या आखण्यात आलेले भविष्यातील दौरे संपल्यानंतर सुरू होईल, असे दि एजने त्याच्या सूत्रांचा हवाला देत स्पष्ट केले आहे. बीसीसीआय सध्या 12 जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी तयारी करत आहे, ज्यात अंतरिम सचिव देवजित सैकिया यांना पूर्णवेळ भूमिका मिळण्याची अपेक्षा आहे. शाह यांनी गेल्या महिन्यात आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचे पद सोडले होते आणि सैकिया यांची अंतरिम नियुक्ती करण्यात आली होती.
बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सूचित केले की, 2016 साली आयसीसीमध्ये प्रथमच द्विस्तरीय कसोटी प्रणालीचा गांभीर्याने विचार केला जाऊन त्यासंदर्भात चर्चा सुरू झाली होती. ‘आम्हाला अद्याप अशा कोणत्याही हालचालीची माहिती नाही. सध्या एसजीएमची तयारी केली जात आहे आणि अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही चर्चा करणे आवश्यक आहे’, असे त्याने सांगितले. बीसीसीआयच्या एका सूत्राने की, काही काळापूर्वी त्या दिशेने हालचाल झाली होती, परंतु त्यानंतर आम्ही त्यासंदर्भात काहीही ऐकलेले नाही.
बीसीसीआय आणि झिम्बाब्वे तसेच बांगलादेशच्या क्रिकेट संघटनांनी महसूल कमी होण्याची शक्यता पुढे करून या निर्णयाला विरोध केला. त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, अशी व्यवस्था अस्तित्वात आल्यास लहान राष्ट्रे अव्वल संघांविऊद्ध खेळण्याची संधी गमावतील. तथापि, त्यानंतरच्या नऊ वर्षांत बरेच काही बदलले आहे आणि माजी भारतीय कर्णधार रवी शास्त्राr यांच्यासारखे काही नामांकित तज्ञ देखील या व्यवस्थेचे समर्थन करू लागले आहेत.