इब्राहिम अन् खुशी एकत्र झळकणार
बॉलिवूडचे स्टार किड्स इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर हे करण जौहरच्या आगामी चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाउना गौतम करणार आहे. शाउनाने यापूर्वी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी करण जौहरची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले होते. इब्राहिम आणि खुशी यांच्या रोमँटिक-कॉमेडीपटामध्ये सुनील शेट्टी हे महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटासोबत शाउना गौतम ही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्वत:चे पदार्पण करेल. तर खुशी कपूरचा हा दुसरा चित्रपट आहे. खुशीने यापूर्वी ‘आर्चीस’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तर इब्राहिम अद्याप बॉलिवूडमध्ये दाखल झालेला नाही. इब्राहिम आणि खुशी या दोघांसाठीही हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनची डिजिटल विंग धर्मेटिक्सकडून केली जाणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याकरता निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. चित्रपटासाठी अनेक नावांवर सध्या विचार सुरू असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले.