तडजोड करण्यापेक्षा पक्ष बंद करणार
प्रशांत किशोर यांचे वक्तव्य : सम्राट चौधरी, तेजस्वी यादवांशी हातमिळवणी नाही
वृत्तसंस्था, पाटणा
बिहारच्या बांकीपूर येथील पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यावर जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी किंवा राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत कधीच राजकीय तडजोड करणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. वेळप्रसंगी मी जनसुराज पक्ष बंद करेन, परंतु या दोन्ही नेत्यांसोबत हातमिळवणी करणार नसल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
जर मला या दोन्ही नेत्यांपैकी एकाची निवड करायची असेल तर मी यापूर्वीच त्यांच्यासोबत गेलो असतो. आमचे राजकारण सत्ता मिळविण्यासाठी नाही. आम्ही आमदार होत ठेके मिळविण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. पराभव मान्य आहे, जनसुराज बंद करणेही मंजूर आहे, परंतु तडजोड करणार नाही असे प्रशांत यांनी म्हटले आहे. बांकीपूर येथील भाजपचा पराभव हा त्याच्या पक्षांच्या चुकांचा परिणाम आहे. भाजपने चुकीचे निर्णय घेतले आणि जनतेला कमी लेखले. बिहारच्या जनतेने सम्राट चौधरींच्या नेतृत्वाला स्वीकारले नाही हाच संदेश बांकीपूरच्या निवडणुकीतून स्पष्टपणे मिळाला असल्याचा दावा प्रशांत यांनी केला आहे.
केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा किंवा लालूप्रसाद यांच्या भीतीपोटी लोक नेहमीच आपल्याला मत देत राहतील असे भाजपने मानून चालू नये. जनतेला जेव्हा चांगला पर्याय मिळतो, तेव्हा ती त्वरित निर्णय घेते. निवडणुकीदरम्यान काही नेत्यांची वक्तव्यं जनतेला पसंत पडली नाहीत. कुणालाही उमेदवार केले तरीही निवडणूक जिंकू असे काही नेत्यांनी म्हटले होते. अशा वक्तव्यांमुळे जनतेच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली आणि लोकांनी मतदानाद्वारे उत्तर दिल्याचे प्रशांत किशोर यांनी नमूद केले आहे.
बांकीपूर मतदारसंघात आमदाराशी निगडित कुठल्याही कामात भ्रष्टाचार होऊ देणार नाही. जर एक वर्षाच्या आत शासकीय शाळांच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर गरीब परिवारांच्या मुलांच्या खासगी शाळेतील शिक्षणाचा खर्च मी उचलणार आहे. बांकीपूरला चांगले शहर करण्यासाठी एक ब्ल्यूप्रिंट तयार केला जाईल, जेणेकरून आगामी वर्षांमध्ये याचा लाभ लोकांना मिळू शकेल असे प्रशांत यांनी म्हटले आहे.
जनतेसमोर चांगला उमेदवार अन् मजबूत मुद्दा असतो, तेव्हा लोक जातीच्या मुद्द्याला बाजूला सारून मतदान करतात. बांकीपूरमध्ये सर्व वर्ग अन् जातींच्या लोकांनी समर्थन दिले. माझा उद्देश विरोधी पक्ष किंवा जनतेचा चेहरा होणे नी. मी बिहारच्या सामान्य लोकांचा आवाज होऊ इच्छितो. माझ्या राजकारणाचा मुख्य मुद्दा शिक्षण, रोजगार, पलायन रोखणे आणि बिहारचा विकास असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.