यापुढे हे सहन करणार नाही!
काँग्रेसश्रेष्ठींची सिद्धरामय्यांना ताकीद : बोलावून चर्चा करण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
गृहनिर्माण योजनांमधील घरांसाठी लाच द्यावी लागत असल्याचा गौप्यस्फोट राज्य नियोजन आयोगाचे आणि आळंदचे आमदार उपाध्यक्ष बी. आर. पाटील यांनी केला होता. त्यांच्यापाठोपाठ अनुदानासंबंधी कागवाडचे आमदार राजू कागे आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी जाहीरपणे वक्तव्य केल्यानंतर राज्य काँग्रेस सरकारची कोंडी झाली आहे. याची काँग्रेस हायकमांडने गंभीरपणे दखल घेतली आहे. “यापुढे असे झाले तर सहन करता येणार नाही. फोन करून त्या आमदारांशी चर्चा करा,” असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिला आहे.
नवी दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. याप्रसंगी आमदार बी. आर. पाटील आणि इतर नेत्यांनी केलेल्या जाहीर वक्तव्यांविषयी चर्चा करण्यात आली. बी. आर. पाटील यांनी दोनवेळा सरकारविरोधात वक्तव्य केले आहे. त्यांना बोलावून घ्या आणि चर्चा करा. यापुढे असे झाले तर चालणार नाही. पुन्हा एका उघडपणे नाराजी व्यक्त केली तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पक्षश्रेष्ठींनी दिला आहे.
तत्पूर्वी सिद्धरामय्या यांनी पक्षाचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांची नवी दिल्लीतील लोदी इस्टेट येथील निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी मंत्री एच. सी. महादेवप्पा, आमदार अशोक पट्टण उपस्थित होते. आमदारांकडून अनुदानासंबंधी व्यक्त होत असलेली नाराजी आणि इतर मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
सुरजेवाला पुढील आठवड्यात बेंगळुरात
राज्य सरकारविषयी आमदारांकडून उघडपणे नाराजी व्यक्त होत असल्याने याविषयी चर्चा करण्यासाठी राज्य काँग्रेस प्रभारी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव रणदीप सुरजेवाला पुढील आठवड्यात बेंगळूरला येतील. राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतील. बैठकीत पक्षपदाधिकारी व मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे बैठक घेण्याची शक्यता आहे. सुरजेवाला यांना पक्षाने कर्नाटक काँग्रेसच्या आमदारांच्या जाहीर वक्तव्यांना लगाम घालण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.