विकासाच्या वाटचालीत अडथळे निर्माण करणाऱ्यांना मी सहन करणार नाही – मंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी । प्रतिनिधी
"माझ्या मतदारांनी मला मोठं केलं आहे. त्यांचे ऋण फेडण्यासाठी मी दिवस-रात्र काम करतो. काहीजण माझ्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे खपवून घेतले जाणार नाही," असा स्पष्ट इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. केसरकर यांनी जनतेप्रती आपली बांधिलकी व्यक्त करताना विरोधकांच्या आरोपांवर कडवट भाषेत उत्तर दिलं.केसरकर यांनी सांगितलं की, "माझं प्रेम जनतेवर आहे आणि त्याचं कारण मला मतदारांनी मोठं केलं. माझ्यावर टीका करणाऱ्यांशी माझं देणं घेणं नाही, पण सभ्यतेचीही एक मर्यादा असते. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आपल्या कर्मांचं स्मरण ठेवायला हवं. काहीजण माझ्यावर टीका करतात, पण तेच लोक कधी काळी खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये होते. त्यांनी सहा महिने तुरुंगात घालवले आहेत. आता ते माझ्यावर टीका करत आहेत म्हणजे माझ्या सभ्यतेचा गैरफायदा घेत आहेत.
"विकासाच्या कामांत अडथळे आणि शिरशिंगे धरण प्रकल्प
विरोधकांनी माझ्या मतदारसंघातील कामे थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, असं सांगताना केसरकर यांनी शिरशिंगे धरण प्रकल्पाचं उदाहरण दिलं. "शिरशिंगे धरण गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित आहे. जर हे धरण पूर्ण झालं असतं, तर आठ गावांना पाण्याचा लाभ झाला असता. मात्र, भ्रष्टाचारामुळे हे प्रकल्प थांबले. या भ्रष्टाचारात ज्यांनी सहभाग घेतला, त्यांनी आता मला दोष देण्याचा प्रयत्न केला आहे," असं केसरकर यांनी सांगितलं. केसरकर यांनी पुढे स्पष्ट केलं की, "मी आता शिरशिंगे धरण प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे, आणि त्यासाठी शासनाने नवीन जीआर काढला आहे. लवकरच या प्रकल्पाचं काम सुरू होईल, आणि आठ गावांचा विकास मार्गी लागेल."
केसरकर यांच्या मते, विरोधकांनी जनतेसमोर विकासाचा विरोध करण्याऐवजी भ्रष्टाचारात स्वत:ला गुरफटवून घेतले. "जे लोक आज माझ्यावर टीका करतात, तेच भ्रष्टाचारात बुडाले आहेत. त्यांनी जनतेचा पैसा वाया घालवला, आणि शिरशिंगे धरणाचं काम थांबवलं. यामुळे या भागातील लोकांना पाणी मिळालं नाही, आणि त्यांचा विकास थांबला. पण आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो आहे," असं त्यांनी सांगितलं.
केसरकर यांनी कबुलायतदार जमिनीच्या प्रश्नावरही भाष्य केलं. "चौकुळ भागातील कबुलायतदार जमिनीच्या प्रश्नावर काम करण्यासाठी मी आधीच एक समिती नेमली आहे. आता आंबोलीच्या कबुलायतदारांसाठी सुद्धा एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या माणसांना न्याय मिळवून देणं, हा माझा उद्देश आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.केसरकर यांनी विरोधकांच्या आरोपांना खोडून काढत असंही सांगितलं की, "सावंतवाडीत राहून मी सगळी कामं पूर्ण करू शकत नाही. कामं मंजूर करण्यासाठी मला मुंबईत रहावं लागतं." त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देत असंही नमूद केलं की, ते जनतेसाठी अहोरात्र काम करतात आणि फक्त चार तास झोप घेतात.
केसरकर यांनी सांगितलं की, "तिलारी प्रकल्पाच्या अंतर्गत अम्युजमेंट पार्क उभारण्यास मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे या भागातील विकासाला चालना मिळेल. या भागात वीस लोकांची एक फार्मास्युटिकल कंपनी येणार आहे, आणि लवकरच इथे औद्योगिक क्रांती पाहायला मिळेल."केसरकरांनी त्यांच्या विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या विरोधाला सामोरे जाण्याचं आव्हानही स्वीकारलं आहे. "काही जण विकासप्रकल्पांना विरोध करत आहेत, भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशा अपप्रवृत्तींचा मी सामना करणार आहे. जनतेनेही अशा प्रवृत्तीपासून सावध राहायला हवं."
केसरकर यांनी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल बोलताना सांगितलं की, "मी 66,000 शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. दोन वेळा 1,100 कोटी रुपयांची मंजुरी मिळवली आहे. शिक्षकांप्रती माझी बांधिलकी आहे, आणि मी पुढेही शिक्षण क्षेत्रात काम करत राहणार आहे."केसरकर सांगितले की, "मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रश्नाचं लवकरच समाधान होईल. या भागात मोठं हॉस्पिटल उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ताज ग्रुपचे हॉटेल देखील या भागात उभं राहणार आहे."परंतु, विरोधकांनी विकासकामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे, असं ते म्हणाले. "काही लोक या प्रकल्पांना विरोध करून भांडणं लावण्याचं काम करत आहेत. अशा लोकांपासून सावध राहणं आवश्यक आहे," असं केसरकर यांनी जनतेला आवाहन केलं.सावंतवाडीत उभारण्यात येणाऱ्या साई मंदिराबद्दलही केसरकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. "सावंतवाडीत भव्य साई मंदिर उभारण्यात येईल. यासाठी मी कटिबद्ध आहे. साई मंदिराची प्रतिकृती आधीच माझ्या निवासस्थानी प्रतिष्ठापित करण्यात आली आहे, आणि त्याचे पूजन केलं आहे," असं त्यांनी सांगितलं केसरकर यांनी , "लवकरच बारा नवीन रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे आरोग्यसेवेत मोठी प्रगती होईल."
विरोधकांवर कठोर इशारा केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या इशाऱ्यात, "मोपा विमानतळ प्रकल्पामुळे या भागातील जमिनींचे भाव वाढले आहेत, आणि काही लोकांनी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यालाही मर्यादा आहेत. लोकांनी या प्रकारांपासून सावध राहावं," असा कठोर इशारा दिला., केसरकर यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली. "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, आणि तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी माझं कटिबद्ध असणं अजूनही कायम आहे," असं त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी विरोधकांवर टीका करताना आपल्या विकासकार्याची यादी सादर केली, जनतेसाठी आपली बांधिलकी व्यक्त केली