घाईत कुठलाच करार करणार नाही
व्यापार करारप्रकरणी गोयल यांची स्पष्ट भूमिका : दबावाखाली अटी मान्य करणार नाही
वृत्तसंस्था/ बर्लिन
भारत कुठल्याही व्यापार करारावर घाईत स्वाक्षरी करणार नाही तसेच अल्पकालीन लाभासाठी स्वत:च्या दीर्घकालीन आर्थिक हितसंबंधांबद्दल तडजोड करणार नसल्याचे वक्तव्य केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी केले आहे. भारत अनेक प्रमुख देशांसोबत विशेषकरून अमेरिकेसोबत व्यापार विषयक चर्चा करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. व्यापार करार केवळ आयातशुल्क किंवा बाजारपेठेत प्रवेशापर्यंत मर्यादित नसतात, तर हा विश्वास, दीर्घकालीन भागीदारी आणि जागतिक व्यावसायिक सहकार्यासाठी शाश्वत संरचना निर्माण करण्याचे माध्यम असतो, असे गोयल यांनी बर्लिन येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले आहे.
अल्पकालीन दृष्टीकोनामुळे करार केवळ 6 महिन्यांमध्ये काय घडणार यावर निर्भर नाही. ही केवळ अमेरिकेला स्टील विकण्याची बाब नाही, असे गोयल यांनी म्टले आहे. त्यांची ही टिप्पणी अमेरिकेसोबत जारी व्यापार चर्चेकडे इशारा करणारी होती. भारताचा दृष्टीकोन दीर्घकालीन रणनीतिवर आधारित असून तात्कालिक आकडेवारी किंवा दबावात येऊन आम्ही निर्णय घेत नाही. व्यापार करार दीर्घकाळासाठी असतात, ही केवळ शुल्काची बाब नव्हे, तर विश्वास आणि संबंधांची बाब आहे, असे गोयल यांनी सांगितले आहे.
भारताने कधीच राष्ट्रहिताच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही आधारावर आपले मित्र कोण असावेत याचा निर्णय घेतला नाही. युरोपीय संघाचे तुम्ही मित्र होऊ शकत नाही असे जर कुणी सांगितले तर मी ते मान्य करणार नाही. उद्या जर कुणी मला केनियासोबत काम करू नका असे सांगितले तर स्वीकारार्ह नसेल अशी टिप्पणी गोयल यांनी केली. अमेरिका भारतावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकत असल्याने ही टिप्पणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
भारत-अमेरिका चर्चेत प्रगती
भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सरकत आहे. आम्ही अमेरिकेसोबत चर्चा करत आहोत. आमच्या टीम्स सक्रीय स्वरुपात काम करत आहेत. अलिकडेच वाणिज्य सचिवांनी अमेरिकेचा दौरा करत स्वत:च्या समकक्षांशी चर्चा केली होती. आम्ही एक निष्पक्ष आणि समानता-आधारित कराराच्या दिशेने पुढे सरकत आहोत, असे गोयल यांनी गुरुवारीच म्हटले होते. दोन्ही देश दीर्घकाळापासून रखडलेल्या व्यापार कराराला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याच्या अंतर्गत अमेरिका भारतीय आयातीवर आकारण्यात येणाऱ्या 50 टक्के आयातशुल्काला कमी करू शकतो. 2030 पर्यत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचविण्याचे भारत आणि अमेरिकेचे लक्ष्य आहे.
अमेरिकेच्या प्रतिनिधींशी चर्चा
यापूर्वी 13 ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे नामनिर्देशित राजदूत सर्जियो गोर यांनी भारताचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेतली होती. बैठकीत दोन्ही देशांदरम्यान आर्थिक संबंधांना आणखी मजबूत करणे आणि अमेरिकेची गुंतवणूक वाढविण्यावर चर्चा झाली. सर्जियो गोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आगामी काळात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत होणार असल्याचे वक्तव्य केले होते.
भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार
पियूष गोयल सध्या जर्मनी दौऱ्यावर असून तेथे त्यांनी भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारावर देखील चर्चा केली आहे. जर्मन चॅन्सेलरांचे आर्थिक तसेच वित्तीय धोरण सल्लागार तसेच जी7 आणि जी20 शेरपा डॉ. लेविन होले यांच्याशी भारत-जर्मनीदरम्यान प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्याच्या संधीबद्दल चर्चा केली. भारत-ईयू मुक्त व्यापार करारावरही सकारात्मक चर्चा झाली आहे. दोन्ही देश संयुक्त समृद्धीसाठी प्रतिबद्ध असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.