For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जीवाची पर्वा करणार नाही, बांगलादेशात परतणार

06:22 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
जीवाची पर्वा करणार नाही  बांगलादेशात परतणार
Advertisement

शेख हसीना यांची घोषणा : डिसेंबरमध्ये मायदेशी जाणार

Advertisement

वृत्तसंस्था, गाजियाबाद

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी डिसेंबर 2026 मध्ये मायदेशी परतणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. स्वत:च्या व्यक्तिगत सुरक्षेवरून मी चिंतेत नाही. मी माझा देश आणि लोकांदरम्यान परतू इच्छिते. जर माझ्या नशीबात दुसरे काही लिहिले असेल तर ते मी स्वीकारणार असल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे.

Advertisement

हसीना यांनी बांगलादेशातील वर्तमान राजकीय स्थितीवरूनही चिंता व्यक्त केली. अवामी लीगेचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई, राजकीय अधिकार आणि लोकशाही प्रक्रियेशी निगडित मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अवामी लीगवरील बंदी हटवत राजकीय अधिकार पूर्ववत करण्याची मागणी शेख हसीना यांनी केली आहे.

बांगलादेशातील कायद्याचे राज्य, न्यायालयीन स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून शेख हसीना यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला लोकशाही, न्याय आणि मानवाधिकारांच्या समर्थनार्थ आवाज उठविण्याचे आवाहन त्यांनी केले. बांगलादेशातील स्थिरतेचा प्रभाव पूर्ण दक्षिण आशिया आणि बंगालच्या उपसागर क्षेत्रावर पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मी मायदेशी सत्ता प्राप्त करण्यासाठी नव्हे तर स्वत:च्या लोकांसोबत उभे राहण्यासाठी आणि बांगलादेशला पुन्हा लोकशाहीच्या मार्गावर आणण्यासाठी परतणार आहे. राष्ट्रीय तडजोड आणि राजकीय प्रक्रियेत अवामी लीगची वापसी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु शेख हसीना यांना बांगलादेशात गंभीर कायदेशीर आव्हानांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट 2024 मधील हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांना बांगलादेशातून बाहेर पडत भारतात आश्रय घ्यावा लागला होता. त्यानंतर बांगलादेशातील एका न्यायालयाने शेख हसीनांच्या अनुपस्थितीत त्यांना मृत्युदंड ठोठावला होता. तर बांगलादेश सरकार शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारत सरकारकडे सातत्याने करत आहे.

Advertisement
Tags :

.