हायकमांडने बोलावल्यानंतरच दिल्लीला जाणार
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मला काही बाबतीत सांगितले आहे. योग्यवेळी दोघांनाही बोलाविले जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही दोघेही दिल्लीला जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. शनिवारी बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानाजवळ पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
विधिमंडळ अधिवेशनानंतर हायकमांडना भेटण्यासाठी तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही का, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, जर तसे असेल तर आम्ही तुम्हालाही कळवू. मी तुम्हाला कळवल्याशिवाय काहीही करणार नाही. मी गुप्तपणे जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात ईडीने दाखल केलेले आरोपपत्र न्यायालयात फेटाळण्यात आले असून आता एफआयआर प्रलंबित आहे. आमच्यावर करीत असलेल्या द्वेषाच्या राजकारणाची माहिती देण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. चौकशीसाठी दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी मंगळवारी दिल्लीला जात आहे आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांना भेटेन. त्यादिवशी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी नदी जोडणीच्या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे. त्यादिवशी आमच्या राज्यातील म्हादई, कृष्णा अप्पर, मेकेदाटू, भद्रा अप्परसह महत्त्वाच्या योजनांवर चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
याचवेळी आपण केंद्रीय वन आणि नगरविकास मंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. राज्याच्या हितासाठी त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील खासदारांनाही भेटण्याचा विचार करत होतो. या सर्वानंतर जर ते आले तर मी पंतप्रधानांनाही भेटेन, असेही शिवकुमार म्हणाले.
नागासाधूंच्या आशीर्वादाबद्दल विचारले असता ते म्हणाले, त्यांनी माझे घर शोधत येऊन मला आशीर्वाद दिला आहे. माझ्या घरी येणाऱ्यांना मी नकार देऊ शकत नाही. आपण राजकारणात असल्याने आपल्याला संत, स्वामीजी, वडीलधारी यांच्यासह सर्व प्रकारच्या लोकांची आवश्यकता आहे. आपले सरकार धर्मादाय खाते चालवत आहे. वक्फ आणि चर्चसह सर्व धार्मिक केंद्रांना मदत केली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.