For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऊर्जा असेपर्यंत केएलईसाठी कार्यरत राहीन

06:38 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऊर्जा असेपर्यंत केएलईसाठी कार्यरत राहीन
Advertisement

डॉ. प्रभाकर कोरे यांचे प्रतिपादन : 40 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीसाठी केएलई परिवारतर्फे सत्कार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

देशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये केएलईचे नाव अग्रभागी येते. सप्तऋषिंनी लावलेल्या रोपट्याचा आज भव्यदिव्य वटवृक्ष झाला आहे. सत्य, प्रेम आणि त्यागाच्या जोरावर मागील 40 वर्षांत सहकाऱ्यांच्या मदतीने एक कुटुंब म्हणून केएलई संस्था चालविली. सर्वांच्याच सहकार्यातून संस्था आज भरभराटीला आली आहे. मागील 100 वर्षांत निष्ठेने आणि स्वच्छ प्रतिमेने चालवलेली ही संस्था भविष्यातही अशीच प्रगती करीत राहील. जोवर शरीरात ऊर्जा आहे तोवर केएलई संस्थेसाठी कार्यरत राहीन, असे प्रतिपादन केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले.

Advertisement

केएलई परिवारच्यावतीने शनिवारी जेएनएमसी परिसरात आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारून 40 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. डॉ. कोरे म्हणाले, केएलई संस्था कोणत्या अध्यक्ष अथवा कार्यकारी मंडळामुळे नावारुपास आली नाही तर येथील शिक्षकांनी जो शिक्षणाचा पाया रोवला त्यामुळे संस्था देशासह विदेशातही पोहोचली. बेळगावसोबत हुबळी, बेंगळूर, पुणे, मुंबई, दिल्लीसह दुबईमध्येही संस्थेने आपला पसारा वाढविला आहे. 90 कोटी रुपयांचा असणारा संस्थेचा वार्षिक अर्थसंकल्प आता 3 हजार 200 कोटींवर पोहोचला असल्याची माहिती त्यांनी दिली.

रुग्णांना उत्तम सेवा दिली जावी या उद्देशाने मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज सुरू केले. बेळगावसह परिसरातील कर्करोगाच्या रुग्णांना मोठ्या महानगरांमध्ये उपचारासाठी जावे लागत होते. यासाठीच सुसज्ज असे टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या तोडीस तोड हॉस्पिटल कर्करोग उपचारासाठी उभारण्यात आले आहे. संस्था एका रात्रीत मोठी झालेली नसून सप्तऋषिंचे मोठे योगदान आहे. गावोगावी जावून देणगी गोळा करून संस्था उभी केली. आज देणगीची कोठेही कमतरता जाणवत नाही. सर्व जाती-धर्माचे लोक केएलई संस्थेच्या योगदानासाठी मदत करत आहेत. त्यामुळे नवीन तरुणांनीही संस्थेचा नावलौकिक कसा होईल याचा विचार करावा, असे डॉ. कोरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

अमित कोरे यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांचे अभिनंदन करत या प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. प्रभाकर कोरे यांच्या यशामागे महत्त्वाचा वाटा पत्नी आशा कोरे यांचा आहे. प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये त्यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांना मोलाची साथ दिली. त्यामुळेच प्रभाकर कोरे हे नाव देशभरात ओळखले जात असल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले. वीरण्णा चरंतीमठ यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्था कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.

वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रात प्रभाकर कोरे हे मोठे नाव आहे. केवळ काही संस्थांपुरती मर्यादित असणारी केएलई आज देशातील अनेक राज्यांमध्ये पोहोचली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हे या संस्थेचे वैशिष्ट्या असल्याचे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले. यावेळी एस. व्ही. संकूर, अल्लमगुरु बसवराज, सुशील नमोशी, शंकर मुनवळ्ळी, महांतेश कवटगीमठ यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रभाकर कोरे यांच्या जीवनावर आधारित ‘रत्नराज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. प्रभाकर कोरे यांची पत्नी आशा कोरे, डॉ. वीरण्णा चरंतीमठ, महांतेश कौजलगी, बी. जी. देसाई, विश्वास पाटील, एस. व्ही. साधुन्नावर, अमर बागेवाडी, राजू मुनवळ्ळी, वाय. एस. पाटील, एम. सी. कोळी, बाबन्ना यरगुट, अमित पट्टेद, बसवराज देशमुख यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.